PSI रणजीत कासलेंना बीड पोलिसांनी केली अटक, एन्काउंटरबाबत मोठा दावा

पुणे : विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा पीएसआय रणजित कासले यांनी केला आहे. "मी आधी पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार आहे. पुणे पोलीस किंवा बीड पोलिसांकडे स्वत:ला सरेंडर करणार आहे", असं रणजित कासले यांनी सांगितलं. मात्र,आत्मसमर्पण करण्याआधीच निलंबित पीएसआय रणजीत कासले याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज (शुक्रवारी) पहाटे बीड पोलिसांनी कासले यांना ताब्यात घेतलं आहे. काल दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले पुण्यात मुक्कामी होते. पुणे विमानतळावर काल (गुरूवारी) रणजीत कासले यांनी पुन्हा गंभीर आरोप केले होते. पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडं अटक होणार असं रणजीत कासले यांनी सांगितलं होतं. मात्र आज पहाटे रणजीत कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी कसले यांना ताब्यात घेतलं आहे. कासलेंना ताब्यात घेतल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.
रणजित कासलेंचा एन्काउंटरबाबत मोठा दावा काय?
रणजित कासलेंनी पुण्यात आल्यावरती माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी बोलताना ते म्हणाले, "बोगस एन्काउंटर काय असतं ते आधी समजावून सांगतो. केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृहसचिव, सचिव यांच्यात गुप्त बैठक होते. जसं अक्षय शिंदेचं झालं. केंद्राकडून सिग्नल मिळाल्यानंतर केंद्रातून चार-पाच अधिकारी येतात. ते स्थानक पातळीवरचे चार-पाच अंमलदार निवडतात. त्यांच्यामार्फत बोगस एन्काउंटर केला जातो. तशीच ऑफर मला होती. कारण त्या ऑफरचे तुम्हाला पुरावे मिळणार नाहीत. कारण शासन किंवा आयपीएस-आयएएस लोकं खूप हुशार असतात. बंद दाराआड चर्चा होते", असा दावा रणजित कासले यांनी केला.