भंडारा : बोलेरो-ट्रक भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

भंडारा : बोलेरो-ट्रक भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

भंडारा : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास भंडाऱ्यानजीक भीषण अपघात घडला. भंडाऱ्याकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या बोलेरो वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना बेला गावाजवळील हॉटेल साई प्लाझा समोर घडली. मृतांमध्ये अशोक फुलचंद डेहरवाल (48, नागपूर), शैलेंद्र लेखाराम बघेले (34, नागपूर), शैलेश पन्नालाल (40, गोकुळपुरे वायुसेना नगर) आणि मुकेश बिंजेवार (32, वाडी नागपूर) यांचा समावेश आहे. जखमी व्यक्तीचे नाव अविनाश नाकतोडे असल्याची माहिती आहे.

भंडारा बायपास अपूर्ण असल्याने जड वाहने शहरातूनच प्रवास करत आहेत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रविवारी बोलेरो चालकाने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रकवर गाडी आदळली, ज्यामुळे बोलेरोचे मोठे नुकसान झाले. धडकेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आणि जखमी व मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.