अदानी ग्रुपचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणारी 'हिंडनबर्ग'कंपनी अखेर बंद ; नाथन ऍण्डरसनने सांगितले 'हे' कारण
वॉशिंग्टन : आपल्या सखोल रिसर्च अहवालांनी अदानी ग्रुपचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणारी हिंडनबर्ग ही रिसर्च कंपनी अखेर बंद झाली आहे. या कंपनीचा संस्थापक नाथन ऍण्डरसनने बुधवारी याबाबत माहिती दिली. याबाबतची एक पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.
शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून पैसे कमावणारी हिंडनबर्ग ही रिसर्च फर्म आहे. काहीच महिन्यांपूर्वी हिंडनबर्गने आपल्या एका अहवालातून अदानी ग्रुपला टीकेचे लक्ष्य केले होते. ज्यामुळे अदानी ग्रुपला अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले होते. काही वर्षांपासून हिंडनबर्ग रिसर्च ग्रुपने अदाणींच्या विरोधात अनेक मोहिमा सुरू केल्या. 2023 पासून अहवाल जारी करत हिंडनबर्गने अदाणी ग्रुपचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान केले. रिसर्च फर्मने कितीही आरोप केले असले तरी हे सगळे आरोप अदाणी ग्रुपने फेटाळले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा चार वर्षांचा कार्यकाळ संपायला काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना हिंडनबर्ग रिसर्चसंदर्भात ही मोठी अपडेट समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.
का बंद केली 'हिंडनबर्ग'?
ही फर्म बंद करण्यामागे काही खास कारण नसल्याचे हिंडनबर्ग रिसर्च ग्रुपचे संस्थापक नाथन ऍण्डरसनने सांगितले आहे. मात्र, आता आपल्याला आपल्या परिवारासोबत वेळ घालवायचा असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आज हा निर्णय घेताना ऍन्डरसनने काही ठोस कारण सांगितलेले नाही. काहीही खास कारण नाही, धोका नाही, आजारपण नाही आणि काही वैयक्तिक कारणही नाही. यशस्वी करिअरच्या विशिष्ट टप्प्यावर आपण स्वार्थी होतो, असे मला कोणीतरी सांगितले होते. आणि त्याच दृष्टीने मी हा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले संस्थापक नाथन ऍण्डरसन ?
सुरुवातीला मला असे वाटले की, मला काही गोष्टी सिद्ध करण्याची गरज आहे. पण, आता मी स्वतःसोबत एकदम कम्फर्टेबल आहे. माझ्या आयुष्यात अशी वेळ पहिल्यांदाच घडली आहे. हे यापूर्वी देखील होऊ शकले असते पण मला स्वतःला वेळ द्यायचा होता, असे ऍन्डरसनने म्हटले आहे. ज्या लोकांबद्दल मला खरोखरंच काहीतरी वाटते, अशा लोकांना गमावल्यानंतर मिळालेली ही दृष्टी आहे. हिंडनबर्ग हा माझ्या आयुष्यातील एक अध्याय आहे. मात्र, यावरून माझ्याबद्दल काहीही अंदाज बांधणे चुकीचे आहे, असेही त्याचे म्हणणे आहे.