हरियाणात खळबळजनक घटना
हरियाणा : कुरुक्षेत्रातील यारा गावातील एका व्यक्तीने आई, वडील, पत्नी यांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली. त्याने आपल्या १३ वर्षाच्या मुलालाहि विष पाजले मात्र सुदैवाने मुलगा वाचला. आरोपी दुष्यन्त सिंग (वय ३८), आरोपीचे वडील नायब सिंग (५५), आई अमृता कौर (५०), पत्नी अमनप्रीत (३५) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविले आहेत. या घटनेमुळे हरियाणात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळाली माहिती अशी, दुष्यंत सिंग शहाबाद नायालयात कामाला होता. तो पैश्याच्या व्यवहाराला कंटाळला होता.या व्यवहारामुळे दुष्यन्त अस्वस्थ झाला होता. यामुळेच दुष्यन्तने असे टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी सुसाईड नोटही मिळाली आहे. दुष्यन्तने प्रथम वडिलांना बेशुद्ध करून गळा दाबला. आई आणि पत्नीलाही विष पाजून गळा दाबला. मुलालाही विष पाजले. त्यानंतर स्वतः प्याला. मुलाच्या सुदैवाने नातेवाईकांना हि घटना समजताच त्यांनी मुलाची सुटका करून त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.