अनेक घोटाळे उघडकिस आणणाऱ्या पत्रकाराचा खून

अनेक घोटाळे उघडकिस आणणाऱ्या पत्रकाराचा खून

रायपूर: स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरून अनेक घोटाळे उघडकिस आणणारे छत्तीसगड राज्यातील बिजापुरामधील पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा निर्घृण खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी आढळून आला. चंद्राकार स्वतंत्र पत्रकारिता करायचे. त्यांचं यूट्यूब चॅनल होतं. त्या माध्यमातून त्यांनी अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत. चंद्राकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश चंद्राकरला एसआयटीच्या पथकानं हैदराबादहून अटक केली. आरोपी सुरेश हैदराबादमध्ये त्याच्या चालकाच्या घरी लपलेला होता. त्याआधी तो सातत्यानं लोकेशन बदल होता. पत्रकार मुकेश चंद्राकार यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

मुकेश चंद्राकार यांच्या ५ बरगड्या मोडण्यात आल्या. धारदार शस्त्रानं त्यांच्या पोटावर अनेक वार करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या यकृताचे चार तुकडे झाले. मुकेश यांच्या छातीवरही बरेच वार केले गेले. त्यामुळे त्यांचं हृदय फाटलेल्या अवस्थेत आढळून आलं. त्यांची मानही मोडलेल्या अवस्थेत आढळून आली. शवविच्छेदन अहवालातून हा तपशील समोर आलेला आहे.

मुकेश यांच्या डोक्यावर मागून एखाद्या रॉडनं हल्ला करण्यात आला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. मुकेश यांच्या डोक्याच्या मागील भागात ४ इंच खोल जखम आढळून आली. डोक्याच्या वरील भागात २ वार झालेले आहेत. छातीवर झालेला एक वार ५ इंच खोल आहे. मुकेशचा मृत्यू झाल्यानंतरही त्याला अतिशय बेदम मारण्यात आलं. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती स्थानिक पत्रकारांना दिली.