शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर ...

मुंबई - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंना वैयक्तिकरित्या शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून अनेक वर्षांनी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर पाऊल ठेवले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच मराठी भाषेच्या मुद्द्यावर आयोजित मराठी विजय मेळाव्याच्या निमित्ताने हे दोघे 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर आले होते. आता वाढदिवसाच्या निमित्ताने झालेली ही भेट त्यांच्या संबंधात सुधारणा होत असल्याचे संकेत देत आहे.
राज ठाकरे यांचे बालपण मातोश्रीतच गेले. तेथे त्यांनी आपल्या काका, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम अनुभवले. मात्र, पुढे मतभेद झाल्यामुळे राज यांनी शिवसेना सोडली आणि स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर राज आणि उद्धव यांच्यातील संबंध तणावपूर्णच राहिले. पण अलीकडे राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये नव्याने संवाद सुरू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र लढणार का..? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने झालेली ही भेट या चर्चांना नवा आयाम देणारी ठरू शकते.