ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हादरला; लाहोर विमानतळाजवळ स्फोटांची मालिका

लाहोर : भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या लाहोर शहरात तीन भीषण स्फोट झाले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात हे स्फोट घडल्याची माहिती समोर आली आहे. लाहोर विमानतळाजवळील वॉल्टन रोडवर हे स्फोट झाले असून, ड्रोन हल्ला झाला असल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. या स्फोटांचे आवाज कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आले. स्फोटानंतर परिसरात सायरन वाजले आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. पोलीस अधिकाऱ्यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानी अधिकारी सध्या या स्फोटांची ठिकाणे आणि कारण तपासत आहेत. गोपाल नगर, नसीराबाद आणि वॉल्टन रोड या भागांमध्ये सलग तीन स्फोटांचे आवाज आले. आवाज ऐकताच लोक घाबरून रस्त्यावर आले. अनेकांनी आकाशात धुराचे लोट पसरलेले दिसल्याचे सांगितले.
स्फोटाचे ठिकाण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉल्टन विमानतळाजवळील पाक लष्कराच्या युनिटजवळ हा ड्रोन हल्ला झाला. या स्फोटांनंतर लाहोर विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. कराची विमानतळावरील विमान वाहतूकही सध्या स्थगित करण्यात आली आहे.
ARY न्यूजच्या रिपोर्टनुसार, तीन स्फोटांचे आवाज तीन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आले. स्फोटानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात बंदोबस्त वाढवला असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भीषण आवाजाने संपूर्ण लाहोर हादरले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम?
७ मेच्या मध्यरात्री भारताने पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी अड्ड्यांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला करत ७० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लाहोरमध्ये हे स्फोट घडल्याने यामागे कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व सरकारी रुग्णालयांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशाची हवाई सीमा २४ ते ३६ तासांसाठी बंद करण्यात आली आहे. इस्लामाबाद आणि पंजाबमधील सर्व शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली असून सुरक्षा दलांना सर्वोच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे.