आसिया पटेल, सुरेखा आवाड यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रा.पं. अधिकारी पुरस्कार

वडणगे : शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंगळवारी सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन्ही वर्षांसाठीचे राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर केले. यामध्ये तासगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत अधिकारी आसिया पटेल यांना २०२२-२३चा, तर शेळकेवाडी (ता. करवीर) मधील ग्रामपंचायत अधिकारी सुरेखा आवाड यांना २०२३-२४ साठीचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार देण्यात येतात. त्यानुसार या पुरस्कारांची यादी शासनाने जाहीर केली आहे.
आसिया पटेल यांची कारकीर्द
तासगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत अधिकारी आसिया पटेल यांनी शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. सांसद आदर्श ग्राम योजनेत फेज ५ व ६ अंतर्गत सर्व विभागांची मिळून ८८ कामे केली. हर घर जल योजनेंतर्गत गावातील प्रत्येक घराला नळजोडणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदी कामे पूर्ण केली आहेत. गावविहिरीवर सोलर पॅनेल बसवले आहे. व्यसनमुक्ती अभियान, देशी गायींचे जतन संवर्धनासह पानी फाउंडेशन अंतर्गत श्रमदान व लोकसहभागातून ८० एकर क्षेत्रात पाणी अडवून जिरवण्याच्या कामाची दखल घेण्यात आली आहे.
सुरेखा आवाड यांची कारकीर्द
सुरेखा आवाड यांच्या कारकिर्दीत शेळकेवाडी ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये पुणे विभागात उत्तेजनार्थ ५० लाखांचे बक्षीस मिळवले आहे. २०२२-२३ सालासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात या ग्रामपंचायतीने जिल्हा स्तर व विभाग स्तरावर पहिला क्रमांक मिळवला आहे. शंभर टक्के सौरग्राम, शासकीय इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक संकलन केंद्र उभारले आहे. गावातील नळ कनेक्शन ऑनलाइन केले आहे. या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.