इंडस्ट्री ५.० मुळे उत्पादन क्षेत्राचा जागतिक चेहरा मोहरा बदलेल - निखिल पडते
कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालय व एआयसीटीई नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अटल’ उपक्रमा अंतर्गत १८-२४ नोव्हेंबर २४ या काळात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘डिजिटल ट्विन बेस्ड कंडिशन मॉनिटरिंग अँड फॉल्ट डायग्नोसिस फॉर इंडस्ट्री ५.०’ असे या कार्यशाळेचे शीर्षक आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन जॅग्ज टेक्नॉलॉजी इचलकरंजीचे संचालक निखिल पडते यांच्या हस्ते आज संपन्न झाले. अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांनी नवनवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात करून आपल्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान प्रेमी बनवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मा. उद्घाटकांनी आपल्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. इंडस्ट्री ५.० ही आधुनिक संकल्पना भविष्यात जगाच्या उत्पादन क्षेत्रातील विविध गोष्टींचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला जर अशा स्पर्धेमध्ये आपले स्थान बळकट करायचे असेल तर अशा प्रकारच्या आधुनिक संकल्पना उद्योग क्षेत्रामध्ये रुजवल्या गेल्या पाहिजेत असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अशा प्रकारच्या विषयाचे आयोजन व्यापक स्तरावर केले गेले पाहिजे असे सांगितले. केआयटी नेहमीच तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक गोष्टींचा अंतर्भाव प्राध्यापकांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अग्रेसर राहिलेली आहे असे त्यांनी नमूद केले. या कार्यशाळेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, मशीन कंडिशन, मॉनिटरिंग अँड फॉल्ट डायग्नोसिस मधील उपयोग आणि महत्त्व या विषयावर अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, व्हीजेटीआय मुंबई, बीएआरसी मुंबई अशा प्रतीथयश शैक्षणिक व संशोधन संस्थेमधील तज्ञांचे मार्गदर्शन उपस्थित प्राध्यापकांना होणार आहे या कार्यशाळेसाठी राज्यभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे ५० प्राध्यापकांनी सहभाग घेतलेला आहे.
कार्यशाळेचे यशस्वी आयोजनासाठी केआयटीचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळा मुख्य समन्वयक म्हणून डॉ.उदय भापकर व सहसमन्वयक म्हणून डॉ.जितेंद्र भाट यांनी विशेष परिश्रम घेतले.