वाल्मिक कराड पोलिसांना शरण

पुणे : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोप होत असलेला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे. वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसच्या मुख्यालयामध्ये शरण आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड गेल्या अनेक दिवसांपासून फरार होते. बीड जिल्ह्यामध्ये २८ डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.
याच घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. वाल्मिक कराडला सरकारमधील कोणाचा वरदहस्त आहे का? नेमकं कोण कोणाला पाठिशी घालतंय? असे अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडले होते. विरोधी पक्षातील नेत्यांसह सरकारमधील आमदारांनीही संतोष देशमुख प्रकरणात कराडांवर आरोप केल्याने सरकारवरही दबाव वाढला होता. अखेर वाल्मिड कराड आता शरण आला आहे.
'मी वाल्मिक कराड'... व्हिडिओ शेअर करत म्हणाला..
मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे, असं वाल्मिक कराड यांनी म्हटलं आहे.