कसबा बीड पुलावरून उडी घेतलेल्या वृद्धास वाचवण्यात यश ; आपत्ती निवारण युवकांचे ग्रामस्थांकडून कौतुक

करवीर ( विश्वनाथ मोरे ) - कसबा बीड पुलावरून उडी घेतलेल्या वृद्धास वाचवण्यात यश आल्यामुळे आपत्ती निवारण युवकांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. करवीर तालुक्यातील कसबा बीड पुलावरून सकाळी दहाच्या सुमारास भोगावती नदीमध्ये एका वृद्धाने उडी घेतली होती. उडी घेतलेल्या वृद्ध व्यक्तीस वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार करवीर तालुक्यातील बीडशेड येथील नागरिक गणपती बाबू सावंत, वय वर्ष 70, यांनी भोगावती पात्रामध्ये उडी घेतली होती.यावेळी आकाश यादव व उदय वनीरे (कोल्हापूर )हे बीडशेडच्या दिशेने जात होते. लघुशंकेला थांबले असता सावंत यांनी पुलावरून उडी मारली हे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच आजूबाजूला असणाऱ्या युवकांना व येणाऱ्या जाणाऱ्यांना सावंत यांनी उडी मारल्याचे सांगितले. नदीपात्रामध्ये उडी घेतलेले सावंत आजूबाजूला असलेल्या झाडात अडकल्याचे दिसून आले. ही घटना कळताच कसबा बीड पुलावर पाहणाऱ्यांची गर्दी झाली होती. उपस्थित युवकांनी आपत्ती निवारण कक्ष 1077 ला कॉल केला.
झाडाचा आधार घेऊन सुमारे एक तास झाडावर अडकलेले सावंत दिसत होते.सदर घटनेची माहिती कळताच घटनास्थळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, महे गावचे सरपंच सचिन पाटील (साळव), माजी उपसरपंच निवास पाटील, विशाल मुळीक, यासह अनेक युवक यांनी तात्काळ भेट देऊन सावंत यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रीतम केसरकर (सडोली दुमाला ),मधुकर मांगोरे (कसबा बीड ),विशाल भैरवनाथ मुळीक (महे ) ,कृष्णात सोरटे यांनी पाण्यात उडी घेऊन सावंत या सुखरूपपणे पाण्यामधून बाहेर काढण्यात यशस्वी झाले.
या मोहिमेमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणारे स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात उडी मारणारे राजेंद सुर्यवंशी, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील जवान प्रीतम केसरकर, विशाल मुळीक, मधुकर मांगोरे, कृष्णात सोरटे व इतर युवक यांनी सावंत यांना बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. गणपती सावंत यांचा जीव वाचवल्याबद्दल कसबा बीड परिसरामध्ये त्यांचे कौतुक होत आहे.
गणपती सावंत यांनी नदीपात्रामध्ये उडी घेतली हे जरी पाहिले असले तरीसुद्धा त्यांनी उडी घेतली की पाय घसरून पडले यावर संपूर्ण परिसरामध्ये कुजबूज सुरू होती.