कैलास मानसरोवर यात्रा २०२५ सहज सेवा ट्रस्ट कोल्हापूर तर्फे मोफत मार्गदर्शन

कोल्हापूर - २०२० पासून कोव्हिड व भारत चीन सीमा वादामुळे स्थगित असलेली कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षानंतर या वर्षापासून सुरू होत आहे.कैलास मानस सरोवर यात्रेचे नियोजन भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत केलेले असते. या वर्षाच्या यात्रेची जाहिरात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत इंटरनेटवरून प्रसिद्ध झालेली आहे. http:/kmy.gov.in. यावर्षी ही यात्रा उत्तराखंडातील लीपुलेख पास वरून व सिक्कीम मधील नाथुला पास येथून आयोजित केली जात आहे. लीपुलेख पास मार्गे 30 जून ते पाच ऑगस्ट या कालावधीमध्ये पाच तुकड्या दिल्लीहून पाठवण्यात येणार आहेत. तर दहा तुकड्या सिक्कीम मधील नाथूला पास मार्गे ११ जून ते तीन ऑगस्ट असे सोडण्यात येतील. लीपुलेख पास मार्गे यात्रा करण्यास २२ दिवस लागणार असून त्याचा खर्च अंदाजे १ लाख ७४ हजार रुपये इतका येणार आहे. तर नाथूला पास मार्गे यात्रा करण्यास २१ दिवस लागणार असून त्याचा खर्च अंदाजे २ लाख ८३ हजार रुपये इतका येणार आहे. याव्यतिरिक्त चार दिवस दिल्ली येथे वैद्यकीय तपासणी व्हिसा व रुपयांचे डॉलर मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणार आहेत.
यात्रेकरिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावयाचे असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ मे २०२५ ही आहे. या यात्रेमध्ये १९५०० फूट उंचीवरील ट्रेकिंगचा समावेश असल्याने इच्छुक यात्रेकरू वैद्यकीय व शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. तसेच या यात्रेचा मार्ग परदेशातून म्हणजेच चीन व्याप्ती तिबेट मधून असल्याने पासपोर्ट असणे गरजेचे आहे. यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंना सहज सेवा ट्रस्ट च्या वतीने सोमवार दिनांक १२ मे रोजी दुपारी १२ वाजता खालील पत्त्यावर मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सहज सेवा ट्रस्ट ऑफिस, स्टेट बँक ट्रेझरी शाखा बिल्डिंग, शाहूपुरी, एस एस कम्युनिकेशन शेजारी, कोल्हापूर
तरी ज्या यात्रेकरूला या यात्रेमध्ये सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी विनामूल्य मार्गदर्शनासाठी श्री सूर्यकांत गायकवाड, शिवस्वरूप, खरी कॉर्नर, कोल्हापूर, मोबाईल नंबर ९४२३२८०६७७ येथे संपर्क साधावा असा आवाहन करण्यात आले आहे.