"विराट खेळू इच्छित होता, पण..." 'या' खेळाडूचं खळबळजनक विधान

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने टेस्ट क्रिकेटमधून अचानक घेतलेल्या निवृत्तीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाला धक्का बसला आहे. इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर कोहलीने घेतलेला हा निर्णय टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला आहे. कारण रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कोहलीच एकमेव वरिष्ठ खेळाडू म्हणून उरला होता.
कोहलीच्या या निर्णयावर सध्या चर्चांचा भडिमार होत आहे. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज असताना कोहलीने निवृत्ती का घेतली?
या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने केलेले विधान विशेष लक्ष वेधून घेत आहे. कैफच्या मते, कोहली इंग्लंड मालिकेसाठी पूर्णतः तयार होता आणि त्यासाठीच त्याने रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण निवड समितीने त्याला हवा तसा पाठिंबा दिला नाही.
कैफ म्हणतो, "मला वाटतं की विराट अजून टेस्ट क्रिकेट खेळू इच्छित होता. पण निवड समितीला त्याच्या गेल्या काही वर्षांतील फॉर्मबाबत शंका होती. त्यांनी कदाचित कोहलीला सांगितले असावे की, आता तुझी जागा टीममध्ये निश्चित नाही. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या नाराज झाला असावा."
त्याने पुढे स्पष्ट केले की, कोहलीने शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय सहज घेतलेला नसावा. "रणजी ट्रॉफी खेळणं हेच दर्शवतं की तो पुनरागमनासाठी तयार होता. मात्र त्याला बीसीसीआयकडून अपेक्षित समर्थन मिळालं नसावं," असेही कैफने म्हटले.
या विधानामुळे आता कोहलीच्या निवृत्तीमागील नेमका मुद्दा काय होता यावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.