गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला ..!

गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला ..!

मुंबई - काही दिवसांपासून ज्या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्या ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला वेड लावून सोडणारा आहे. 

चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून  यावेळी ढवळे फॅमिली म्हणजेच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांनी स्कुटरवर, तर माने फॅमिली म्हणजे ईशा डे आणि प्रसाद ओक यांनी बुलेटवर दिमाखदार पद्धतीने एंन्ट्री घेतली. पुष्पवृष्टीच्या वर्षावात कलाकारांचे स्वागत करण्यात आले. तर, ‘चल जाऊ डेटवर’ या धमाल गाण्यावर कलाकारांनी ठेका धरत माहोल तयार केला. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सई आणि प्रसाद यांच्या एका सीनमुळे मनोरंजन विश्वात चर्चा रंगली होती. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून “प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं” या प्रसादच्या संवादामुळे प्रेक्षकांची चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता अजूनच वाढली. 

चित्रपटातील कथेत ढवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नासाठी दोन कुटुंबं एकत्र येतात. पण या भेटीत अजून एक वेगळचं नातं निर्माण होतं. आता ढवळे आणि माने कुटुंबांमध्ये काय गोंधळ उडणार? आणि ही गुंतागुंत सुटेल का? याचं उत्तर १ मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहे. ‘गुलकंद’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हा चित्रपट पूर्णतः कौटुंबिक असून, यात नात्यांमधली गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचं एकत्रित मिश्रण असणारा विनोदी चित्रपट असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटात ढवळे - माने कुटुंबांच्या संसारात मुरलेला ‘गुलकंद’ प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा आस्वाद घेणारा नक्कीच ठरेल यात काही शंका नाही. 

चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे.