जि. प. कर्मचारी सोसायटीच्या व्याज दरात कपात : अध्यक्ष सुधाकर कांबळे
कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने सभासदांच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या मुख्य इमारतीवर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे संस्थेची महिन्याला किमान ५० हजार रुपयांची बचत होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर कांबळे यांनी रविवारी दिली.
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासदांच्या मुलांचा तसेच निवृत्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचा प्रारंभही झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त सागर बगाडे उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने कर्जावर ९.५० टक्के व्याजदर आकारण्यात येत होता. त्यामध्ये ०.२५ टक्के कपात करून तो ९.२५ टक्के इतका करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. संस्थेतील नोकर भरती पारदर्शीपणे करण्याचा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले.
यावेळी संचालक उत्तम वावरे, रणजित पाटील, मुजम्मील नावळेकर, अमर पाटील, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, संजय शिंदे, क श्रीकांत चव्हाण, रवींद्र जरळी, सुकाणू समितीचे एम. आर. पाटील, महावीर सोळांकुरे उपस्थित होते. उपाध्यक्ष सचिन गुरव यांनी आभार मानले.