कागलमध्ये मेहंदी प्रशिक्षण शिबिरात तीनशे महिला सहभागी

कागल - कागल येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन संचलित राजमाता जिजाऊ महिला समितीमार्फत आयोजित मेहंदी प्रशिक्षण शिबीरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीनशेहून अधिक महिला या प्रशिक्षण शिबीरात सहभागी झाल्या. खर्डेकर चौकातील श्रीराम मंदिर मधील सभागृहात हे प्रशिक्षण तीन दिवस चालणार आहे.राजे बॅंकेच्या चेअरमन नवोदिता घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहंदी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नाममात्र फीमध्ये सहभागी महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कोल्हापुरातील ब्रायडल मेहंदी व्यावसायिक रचना दोषी या महिलांना प्रशिक्षण देत आहेत. उद्घाटनावेळी बोलताना रचना दोषी म्हणाल्या, पूर्वी मेहंदी फक्त एक कला म्हणून ओळखली जात होती. मात्र आता यामध्ये महिलांना घरबसल्या व्यावसायिक संधीही उपलब्ध आहेत. त्यासाठी महिलांनी यामधील संधीची माहिती घेऊन त्यासाठीचे तंत्र आत्मसात करावे. व्यावसायिक प्रचार व प्रसार यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा.
प्रशिक्षण वेळी रचना दोषी यांच्यासह हिमानी दोशी,अर्चना जाधव व सुविधा माने या त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित महिलांना मेहंदीची प्रात्यक्षिके प्रोजेक्टरवर दाखविली. महिलांकडून त्याचा सरावही करून घेण्यात आला. यावेळी मेहंदी कला प्रशिक्षणासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.