“धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं गेलं” : लक्ष्मण हाके

बीड : “धनंजय मुंडे यांना राजकीय हेतूनं जाणीवपूर्वक टार्गेट केलं गेलं. मात्र आज त्यांचा बीड जिल्ह्यातील लोकांकडून सत्कार होत आहे, ही खरी जनभावना आहे,” असं परखड मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलं. श्रीक्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताह प्रसंगी आयोजित कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
हाके पुढे म्हणाले, “मीडिया ट्रायलच्या माध्यमातून बीड जिल्ह्याची जी बदनामी झाली, ती दुर्दैवी होती. पण आजचा भक्तीचा जनसागर पाहता हे स्पष्ट होतं की बीड जिल्हा अध्यात्मिकदृष्ट्या आणि विचारांच्या पातळीवर महाराष्ट्राच्या पुढे जाऊ शकतो.” त्यांनी बीडच्या तुलनेत बिहारशी केलेल्या तुलना आणि गुन्हेगारीच्या प्रतिमेवर नाराजी व्यक्त करत सांगितले की, “ही चुकीची प्रतिमा हजारोंच्या उपस्थितीनं खोडून काढली आहे. बीडचं खरे रूप म्हणजे अध्यात्म आणि सामाजिक एकोपा आहे.”तसेच, हाके यांनी स्पष्ट केलं की, “ज्यांनी राजकीय फायद्यासाठी जातिवाद पसरवला, त्यांनीच बीडची प्रतिमा मलिन केली. आता वेळ आली आहे की बीडचा खरा चेहरा भक्तिभाव, एकात्मता आणि पुरोगामी विचार संपूर्ण महाराष्ट्राला दाखवावा.”
मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंडे प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात
दरम्यान, नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती असून, त्यांचे समर्थक मोठ्या उत्साहात स्वागताची तयारी करत आहेत. ठिकठिकाणी फ्लेक्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत. मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंडे प्रथमच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असल्याने, त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.