"शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता विचारांच्या गद्दारांपाठीशी नाही" : जयंत पाटील

अलिबाग: "शेकापचा कार्यकर्ता निष्ठावंत आहे. सत्तेसाठी विचारांशी गद्दारी करणाऱ्यांच्या पाठीशी तो कधीच उभा राहत नाही," अशा ठाम शब्दांत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी पक्षातील विचारविरोधी प्रवृत्तींवर घणाघात केला. वेश्वी येथील त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी (दि. 17 ) झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
जयंत पाटील यांनी स्व. नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर पाटील, स्व. दत्ता पाटील आणि स्व. मीनाक्षी पाटील यांच्या पुरोगामी विचारांचा आदर ठेवण्याचे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढे जाण्याचे आवाहन केले. "ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, विचार पायदळी तुडवले, आणि सत्तेसाठी प्रतिगामी शक्तींचा हात धरला, त्यांना माफ केले जाणार नाही," असं ते म्हणाले.
त्यांनी स्पष्ट केलं की, शेकापची चळवळ काही माणसांवर अवलंबून नाही. "ज्यांनी मतफोड केली, गद्दारी केली, त्यांची ओळख झाली आहे. आता शेकापचे निष्ठावंत कार्यकर्तेच पक्षाला पुढे नेत राहतील. पुढच्या निवडणुकांमध्ये नव्या जोमाने काम करायचं आहे. गद्दार निर्माण होणार नाहीत, याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे," असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठतेचं कौतुक करत सांगितलं की, पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना लवकरच वेगळं स्थान दिलं जाईल आणि पक्ष अधिक मजबूत केला जाईल. “आजचा कार्यकर्त्यांचा जमाव हीच आमची खरी ताकद आहे,” असेही ते म्हणाले.