शरद पवार यांचा मोठा निर्णय ; संपूर्ण भाकरीच फिरवणार?
मुंबई : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. पक्षाला केवळ दहाच जागा मिळाल्या. या पराभवानंतर आता पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतलाय. शरद पवार आता संपूर्ण भाकरीच फिरवणार असल्याची माहिती मिळत आहे.पवारांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षातील युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष या विविध सेलचे प्रमुख देखील बदलणार आहेत. 8 आणि 9 जानेवारीला राष्ट्रवादी पक्षाची मुंबई जंबो बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक नरिमन पॉईंटच्या यशवंतराव सेंटरमध्ये होणार आहे. शरद पवार देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.मुंबईत 8 जानेवारी पासून सर्व सेल, विधानसभा, लोकसभा आणि विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तर 9 जानेवारी रोजी खासदार, उमेदवार, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांमध्ये चर्चा होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीमध्ये शरद पवार हे सर्व बदलांचे पर्याय जाणून घेणार आहेत.
शरद पवार हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील कायम राहणार का? की त्यांनाही बदलले जाणार याबाबत चर्चा सुरू आहेत.पक्षातील काही जणांना जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष हवेत. आता जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.