कृष्णाकाठी उंब्रज परिसरातील वाड्या-वस्त्या दुष्काळाच्या छायेत ( "पाणी उशाला-कोरड घशाला" अशी अवस्था; प्रगत अशा पश्चिम महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी बाब)
कृष्णाकाठी उंब्रज परिसरातील वाड्या-वस्त्या दुष्काळाच्या छायेत ( "पाणी उशाला-कोरड घशाला" अशी अवस्था; प्रगत अशा पश्चिम महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी बाब)
उंब्रज विभाग प्रतिनिधी/रघुनाथ थोरात
महाराष्ट्र राज्यात प्रगत समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णाकाठी वसलेल्या उंब्रज परिसरातील अवघ्या दोन-चार किलोमीटर अंतरावरील वाड्या-वस्त्या दुष्काळाच्या छायेत अक्षरशः होरफळत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे" पाणी उशाला- कोरड घशाला" अशी काहीशी अवस्था प्रगत अशा पश्चिम महाराष्ट्रासाठी निश्चितच लाजिरवाणी आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कृष्णाकाठी वसलेल्या उंब्रज या निमशहरी गावातून पुणे-बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जातो. गावाच्या पूर्वेस समांतर अशी कृष्णा नदी बारमाही दुथडी भरून वाहते. परंतु,उंब्रज पासून पश्चिमेस अवघ्या दोन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणेगाव(पुनर्वसन), मांगवाडी,अंधारवाडी,साबळवाडी या वाड्या-वस्त्यांवर पाणी प्रश्नाने उग्ररूप धारण केले आहे. या वाड्यावरस्त्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा वणवण करावी लागत आहे. अवघ्या दोन-चार किलोमीटर अंतरादरम्यानचा हा विरोधाभास अनाकलनीय तसेच प्रगत पश्चिम महाराष्ट्रासाठी अशोभनीय असाच म्हणावा लागेल. उंब्रज शिवारामध्ये कृष्णामाईचे पाणी खेळवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारी उमेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था बऱ्याच कालावधीपासून बंद अवस्थेत असल्यामुळे परिसरातील ओढे,नाले तसेच ओहोळ यांसारखी नैसर्गिक जलस्तोत्रे कोरडी पडली आहेत. त्यामुळे विहिरी व कुपनलिकेंची पाणी पातळी घटल्याचे नागरिक सांगतात. पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या विहिरींमध्ये पाणी जमा होण्याचे प्रमाण अत्यंत अत्यल्प असल्यामुळे काही ठिकाणी दोन दिवसांतून फक्त दोन तास तर काही ठिकाणी अक्षरशः चार दिवसानंतर अवघा तासभरच पाणी उपलब्ध होत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान,रोज दोन किलोमीटर पायपीट करत कळंत्रेवाडी येथील उत्तर मांड नदीतून पाणी आणावे लागत असल्याचे मांगवाडी(शिवाजीनगर) येथील नागरिक उमेश दौंडे यांनी सांगितले. त्याचबरोबर कळंत्रेवाडीचे माजी उपसरपंच सुनील थोरात यांनी आपल्या स्वमालकीच्या बोअरवेलचे पाणी नाणेगाव(पुनर्वसन) गावास उपलब्ध करून दिल्यामुळे निदान दर दोन दिवसांनी तरी गावास पाणीपुरवठा होत आहे. नाहीतर खूप बिकट अवस्था झाली असती.अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्य वसंत भोसले यांनी व्यक्त केली. उंब्रज परिसरात असलेल्या कळंत्रेवाडी व भवानवाडी या दोन वाड्या उत्तरमांड नदी काठावर वसल्या आहेत. त्यामुळे पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. परंतु,मांगवाडी,अंधारवाडी तसेच साबळवाडी या डोंगर काठालगतच्या वाड्या-वस्त्यांवर कायमस्वरूपी भक्कम असे जल स्तोत्र नसल्यामुळे दिवसेंदिवस येथील पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे सदरचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढून दिलासा देण्याची मागणी दुष्काळात होरपळणाऱ्या वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांनी एरव्ही फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ मतांसाठी दुष्काळग्रस्त वाड्या-वस्त्यांवर पायपीट करणाऱ्या राज्यकर्त्यांकडे केली आहे.