साउथ सिनेसृष्टीतील 'या' 29 कलाकारांवर ईडीची कारवाई

साउथ सिनेसृष्टीतील 'या' 29 कलाकारांवर ईडीची कारवाई

हैदराबाद – साउथ फिल्म इंडस्ट्रीमधून मोठी बातमी समोर आली आहे. तेलंगणातील 29 नामांकित सेलिब्रिटी, यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स विरोधात बेकायदेशीर सट्टेबाजी अ‍ॅप्सच्या प्रमोशनप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. सायबराबाद पोलिसांनी यापूर्वी दाखल केलेल्या एफआयआरवरून ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (PMLA) तपास सुरू केला आहे. हे सर्व आरोप आर्थिक गैरव्यवहार आणि सामान्य लोकांची फसवणूक या संदर्भात आहेत. या यादीत विजय देवरकोंडा, राणा दग्गुबाती, प्रकाश राज, मंचू लक्ष्मी, निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला, प्रणीता सुभाष, अँकर श्रीमुखी, श्यामला, तसेच यूट्यूबर हर्षा साई, बय्या सनी यादव आणि लोकल बॉय नानी यांची नावे आहेत.

मियापूर येथील व्यावसायिक फनिंद्र शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलीसांनी तपास सुरू केला. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, हे कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्स सट्टेबाजी अ‍ॅप्सचं प्रमोशन करत होते, ज्यामुळे अनेक सामान्य आणि तरुण लोक आर्थिक अडचणीत आले. या अ‍ॅप्समुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे मोठे नुकसान झाल्याचं तक्रारीत नमूद आहे.

सायबराबाद पोलिसांनी 19 मार्च 2025 रोजी 25 जणांविरुद्ध तेलंगणा गेमिंग ॲक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायदा यांतर्गत एफआयआर दाखल केला होता. त्याआधारे आता ईडीने अधिक व्यापक तपासाला सुरुवात केली आहे.

तपासात संबंधित कलाकारांना मिळालेले प्रमोशनचे पैसे, त्यांचे बँक व्यवहार आणि करदायित्व यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ॲप्समध्ये हजारो कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. हे ॲप्स तरुणांना सोप्या कमाईचं आमिष दाखवून त्यांचं आर्थिक आणि मानसिक नुकसान करत आहेत.

विजय देवरकोंडाच्या टीमने स्पष्टीकरण दिलं की, त्यांनी फक्त कौशल्याधारित गेमिंग प्लॅटफॉर्म A23 चे प्रमोशन केलं होतं आणि तो करार 2023 मध्येच संपला होता.

प्रकाश राज यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी 2016 मध्ये एका अ‍ॅपचं प्रमोशन केलं होतं. मात्र त्याचं स्वरूप लक्षात आल्यावर मी स्वत:हून त्यातून माघार घेतली.”

राणा दग्गुबाती यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, “मी जाहिरात करताना सर्व कायदेशीर अटी पाळल्या होत्या.”

ईडीच्या तपासामुळे साउथ सिनेइंडस्ट्रीत खळबळ माजली असून, दोषी आढळल्यास संबंधित कलाकारांना मोठा दंड किंवा कायदेशीर शिक्षा होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणात अधिक तपशील उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.