'गोकुळ' तर्फे शेतकरी अनुदान, सचिवांना कमिशन वाढ - नविद मुश्रीफ

'गोकुळ' तर्फे शेतकरी अनुदान, सचिवांना कमिशन वाढ - नविद मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) जातिवंत म्हैस खरेदी, वासरू संगोपन अनुदान वाढविले, सचिव कमिशन रकमेत वाढही केली आहे. फर्टिमिन प्लस ७५ रुपयांची सूट दिली आहे, योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी केले.

एक जुलैपासून मुऱ्हा म्हशीसाठीचे अनुदान ४० वरून ५० हजार केले आहे. मेहसाणा व जाफराबादी म्हशींसाठी अनुदानाची रक्कम ३५ हजारांवरून ४५ हजार केली. केर्ली (ता. करवीर) येथील म्हैस खरेदी डेपोतून खरेदी केल्यास अनुदान ३० हजारांऐवजी ४० हजार असेल. म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी (गावठी व सुधारित म्हैस)

रेडी वासरू संगोपन अनुदानात वाढ केली आहे. फक्त पहिल्या वेतासाठी  ४० महिन्यांच्या आत गाभण गेल्यास ७ हजार अनुदान मिळायचे  ते ९ हजार केले आहे.

फर्टिमिन प्लस मिनरल मिक्श्चर मोफत दिल्यामुळे दुधामध्ये, फॅट व कृत्रिम गर्भधारणा संख्येत वाढ झाली. त्यामुळे फर्टिमिन प्लस १५० रुपयांचा पुडा ७५ ला देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना एक ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर कालावधीतसाठी आहे. सचिवांच्या कमिशनमध्येही ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांसाठी वाढ केली आहे. एक ते वीस पोत्यांपर्यंत प्रतिमहिना सहावरून दहा, २१ ते ४० किलोच्या पोत्यांपर्यंत आठ वरून १४ आणि ४१ किलोवरील पोत्यांना महिना दहावरून १८ रुपये कमिशन केले आहे.

यावेळी संचालक विश्वास पाटील, अजित नरके, किसन चौगले, पशुसंवर्धन व्यवस्थापक प्रकाश साळोखे, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ. व्हि. डी. पाटील उपस्थित होते.

_ स्लरी प्रक्रिया प्रकल्प उत्पादनाची १७ ते १८ लाख विक्री

_ सौरऊर्जा प्रकल्प, करमाळा येथे ७ ते ८ कोटींची बचत

_ हर्बल पशुपूरक प्रकल्पातून ५२ हजार जनावरांच्या आजारांवर २५ लाखांचा औषधांचा वापर