....अखेर भारत - पाक युद्धाला पूर्णविराम ; अमेरिकेने केली मध्यस्थी

माझा महाराष्ट्र ऑनलाईन डेस्क - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी युद्धविरामावर पूर्ण सहमती दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज X (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, "रात्रभर चाललेल्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांनी दाखवलेल्या समंजस आणि मुत्सद्दी भूमिकेबद्दल अभिनंदन." त्यांनी केले. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर लगेचच पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी देखील हीच माहिती ट्विटर वर शेअर केली.
हा युद्धविराम 'ऑपरेशन सिंदूर' नंतर घडला आहे. ६ मे च्या मध्यरात्री भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात मोठी कारवाई करत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यानंतर पाकिस्तानने सीमेवरील विविध ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला, ज्याला भारताने ठोस प्रत्युत्तर दिले.
याच पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या लष्करी संचालनालय प्रमुखांनी (DGMO) भारताच्या DGMO यांच्याशी संवाद साधला. दोन्ही देशांनी सायंकाळी ५ वाजल्यापासून सर्व प्रकारच्या लष्करी कारवाया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. युद्धविरामाच्या अंमलबजावणीसाठी तात्काळ सूचना दिल्या गेल्या असून, १२ मे रोजी पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.
भारताने यावेळी स्पष्ट इशारा दिला आहे की, भविष्यातील कोणतेही दहशतवादी हल्ले हे थेट युद्ध कृती मानले जातील आणि त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.
दरम्यान, पाकिस्तानने आज पहाटे भारताच्या पश्चिम सीमेला लक्ष्य करत ड्रोन, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी हे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले.