इस्रायल - इराण संघर्ष तीव्र ; भारताचे 4,770 कोटी पणाला

इस्रायल - इराण संघर्ष तीव्र ; भारताचे 4,770 कोटी पणाला

नवी दिल्ली - इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता गंभीर व प्राणघातक टप्प्यावर पोहोचला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू केल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने इस्रायलमधील स्टॉक एक्सचेंज आणि रुग्णालयांवर सायबर हल्ले केले आहेत.

भारताचे धोरणात्मक हितसंबंध संकटात - 

या संघर्षामुळे भारताचे सुमारे 550 दशलक्ष डॉलर (सुमारे ₹4,770 कोटी) धोक्यात आले आहेत. हे आर्थिक आणि धोरणात्मक हितसंबंध मुख्यतः इराणमधील चाबहार बंदराशी संबंधित आहेत, जे भारतासाठी अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी थेट संपर्क साधण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

मे 2024 मध्ये भारताने चाबहार बंदरातील शाहिद बेहेश्ती टर्मिनल 10 वर्षांसाठी चालवण्याचा करार केला होता. हा करार भारताला पाकिस्तानला वगळून अफगाणिस्तान व मध्य आशियामध्ये प्रवेश मिळवून देतो आणि चीनच्या ग्वादर बंदराच्या प्रभावाला तोल देतो.

चाबहार प्रकल्पामधील गुंतवणूक - 

चाबहार बंदराच्या विकासासाठी भारताने आतापर्यंत 85 दशलक्ष डॉलरची थेट गुंतवणूक केली आहे. याशिवाय, भारताच्या एक्झिम बँकेने 150 दशलक्ष डॉलरची क्रेडिट लाईन आणि 400 दशलक्ष डॉलरची अतिरिक्त मदत चाबहार-जाहेदान रेल्वे प्रकल्पासाठी मंजूर केली आहे. ही एकूण रक्कम 550 दशलक्ष डॉलरच्या घरात जाते.

IPGL (इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड) हा भारत सरकारच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट व कांडला पोर्ट ट्रस्टचा संयुक्त उपक्रम आहे, जो चाबहार बंदरात कार्यरत आहे.

संघर्षाचा संभाव्य परिणाम - 

इस्रायल-इराण संघर्ष अधिक तीव्र झाल्यास, चाबहार प्रकल्प व INSTC (International North-South Transport Corridor) या महत्त्वाकांक्षी वाहतूक मार्गावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप आणि पाश्चात्य देशांकडून इराणवर लादले जाणारे निर्बंध यामुळे बंदराच्या कामकाजात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारतीय अधिकारी इराणशी सतत संपर्कात असून, चाबहार प्रकल्पात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत.