कसबा बावडा येथील विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू

कसबा बावडा येथील विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू
कसबा बावडा येथील विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी 


महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कसबा बावडा, बिरंजे पाणंद येथील १९ वर्षीय विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाला आहे. ज्योर्तिंलिंग जयसिंग नाईक अस मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. यानंतर खडबडून जागे झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू केल्या आहेत. आरोग्य स्वच्छता विभागामार्फत या परिसरातील स्वच्छता, किटकनाशक विभागामार्फत औषध व धूर फवारणी तातडीने करण्यात आली.

डेंग्यू हा डास स्वच्छ साठवलेल्या पाण्यात तयार होतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घरामध्ये वापरासाठी भरून ठेवलेले पाण्याचे कंटेनर आणि भांडी आठवडयातून एकदा स्वच्छ करुन ठेवावीत. एक दिवस कोरडा दिवस पाळावा, नारळाच्या करवंटया, न वापरातील डबे, टायर यांची वेळीच विल्हेवाट लावावी, झाडांच्या कुंडया, फ्रिजच्या मागील ट्रे यामध्ये पाणी साचू देऊ नये, संशयित तापाच्या रुग्णांनी जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.