उंब्रज परिसरातील हे ठिकाण बनू लागलयं डेंजर झोन

उंब्रज परिसरातील हे ठिकाण बनू लागलयं डेंजर झोन
कळंत्रेवाडी: पाटण पंढरपूर राज्य मार्गावर दत्त मंदिर परिसरात रस्त्याच्या मधोमध पडलेले मोठे खड्डे( छाया- रघुनाथ थोरात)

उंब्रज परिसरातील हे ठिकाण बनू लागलयं डेंजर झोन

उंब्रज विभाग प्रतिनिधी/रघुनाथ थोरात

उंब्रज,ता.कराड परिसरातील उंब्रज कळंत्रेवाडी हद्दीदरम्यान असलेल्या दत्त मंदिर परिसरात पाटण पंढरपूर राज्य मार्गावर रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताचा धोका कैकपटीने वाढला आहे. त्यामुळे भविष्यात एखाद्या गंभीर दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उंब्रज परिसरातील हा स्पॉट डेंजर झोन बनत असल्याची  प्रचिती वाहनधारकांना येत आहे.दरम्यान, रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करताना चारचाकी तसेच दुचाकीस्वारांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी खड्डे चुकवण्याच्या नादात दुचाकी घसरून तसेच समोरासमोर धडक होऊन वारंवार अपघात घडत असल्यामुळे हा स्पॉट अपघातांचा डेंजर झोन झाल्याचे वाहन चालक सांगतात. रात्रीच्या वेळेस वाहनधारकांना अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार खड्ड्यांमध्ये पडून गंभीर जखमी झाले आहेत.त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे. हे कळेनासे झाले आहे.एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का? असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत असून त्वरित या ठिकाणचे खड्डे बुजवून धोकादायक परिस्थितीतून मुक्तता करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.