लोकांच्या मागणी असेल तर पिलरचा उड्डाणपूल करा ...
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गोवा येथील हॉटेल ताज येथे झालेल्या आढावा बैठकीत सांगली फाटा ते उचगावदरम्यान सुमारे तीन किलोमीटरपर्यंतच्या पिलरचा उड्डाणपूल करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यासंदर्भातील वाढीव प्रस्तावाबाबत देखील त्यांनी सूचना केल्या.
पुणे- बेंगलोर महामार्गाच्या सातारा ते कागल या या अंतरातील सहापदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सहापदरीकरणाचे काम करत असताना शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीज या तीन किलोमीटर अंतरावर पावसाळ्यात महामार्गावर पाणी येऊन सन २०१९ ला आठ दिवस,व २०२१ ला चार दिवस महामार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प होती. तसेच आता पुलांची उंची 10 फुटाने वाढणार होती. त्यामुळे आसपासच्या परिसराला भविष्य पडणाऱ्या पावसाळामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
केंद्रीय मंत्री गडकरी आणि रस्ते अधिकारी, ठेकेदार यांची २३ डिसेंबर रोजी गोवा येथील ताज हॉटेलमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकमधील रस्तेकामांबद्दल बोलण्यासाठी संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीज पिलर उड्डाणपुलाबाबत सखोल चर्चा झाली. यावेळी मंत्री गडकरी यांनी लोकांच्या मागणीनुसार पिलरचा उड्डाणपूल करा आणि याबाबत अभ्यास करून वाढीव प्रस्ताव सादर करा, असे सांगून पिलरच्या उड्डाणपुलाला ग्रीन सिग्नल दिला आहे.