केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्ली सरकारचं काय होणार...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत. कथित मद्य घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून केजरीवालांना ईडीने अटक केली. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्लीतील सरकारचे काय होणार असा उपस्थित झालाय. पदावर असताना अटक झालेले अरविंद केजरीवाल पहिले मुख्यमंत्री असून विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय ईडीकडून गेल्या 15 दिवसांत दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आलीये. याआधी झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. मात्र त्यांनी अटकेआधीच राजीनामा दिला होता. परंतु अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिलेला नाही. तुरुंगातूनच सरकार चालवणार असल्याचे केजरीवाल यांचे म्हणणे आहे. मात्र दिल्लीचे राज्यपाल एलजी व्हीके सक्सेना यांनी त्यांची योजना फेटाळून लावली असून दिल्ली सरकार तुरुंगातून चालणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता दिल्ली सरकारचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. केजरीवाल यांना राजीनामा द्यावा लागणार? पद सोडले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू करता येईल का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळं हा मुद्दा लवकरच न्यायालयापर्यंत पोहोचू शकतो आणि न्यायालयाच्या माध्यमातून मार्ग निघू शकतो. अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती त्याबद्दलची सुनावणी आज होणार आहे. न्यायालय अरविंद केजरीवाल यांना तुरूंगातून सरकार चालवण्याची परवानगी देणार की राजीनामा देण्यास सांगणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.