कोल्हापूरी चप्पलच्या रक्षणासाठी कृष्णराज महाडिक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

कोल्हापूरी चप्पलच्या रक्षणासाठी कृष्णराज महाडिक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई - कोल्हापूरी चप्पलची परस्पर नक्कल होवू नये आणि स्थानिक चर्मकार कारागिरांच्या हक्कांवर गदा येवू नये, यासाठी आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. इटलीतील मिलान शहरातील एका फॅशन शो मध्ये, प्राडा या आंतरराष्ट्रीय कंपनीने थेट कोल्हापूरी चप्पलची हुबेहुब डिझाईनची कॉपी केली आहे. वास्तविक २०१९ मध्येच भारत सरकारने कोल्हापूरी चप्पलला जिआय टॅग दिला आहे. त्यामुळे प्राडा कंपनीकडून कोल्हापूर चप्पलची कॉपी करून, स्थानिक कारागिरांवर अन्याय केला जातोय, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

२३ जूनला इटलीमध्ये झालेल्या एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर करण्यात आला. कोल्हापूरच्या चर्मकार कारागिरांसाठी हा एक सुखद धक्का होता. मात्र फॅशन शो आयोजकांनी कोल्हापूरी चप्पलचा असल्याचा कुठेही उल्लेख केला नाही किंवा प्रदर्शनासाठी कायदेशीर परवानगी घेतली नाही. वास्तविक २०१९ मध्येच कोल्हापूरी चप्पलला जिओ टॅगींग करून, एकप्रकारे कोल्हापूरी चप्पल बॅ्रँडचे आंतरराष्ट्रीय रजिस्ट्रेशन झाले आहे. अशा परिस्थितीत आज कोल्हापुरातील काही चर्मकार कारागिरांना घेवून, युवा नेते कृष्णराज महाडिक यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

कोल्हापूरी चप्पल ही कोल्हापूरची आणि महाराष्ट्राची ओळख आहे. या चप्पलला भारत सरकारनं जिआय टॅग दिल्याने, त्याचे उत्पादन ठराविक क्षेत्रात नोंदणीकृत कारागिरांकडूनच होवू शकते. अशा परिस्थितीत प्राडा या कंपनीने इटलीतील फॅशन शो मध्ये कोल्हापूरी चप्पल सारखीच हुबेहुब डिझाईनची चप्पल सादर केली आणि त्याचा मुळ उगम किंवा कारागिरांचा कसलाही उल्लेख केला नाही. त्यातून स्थानिक कारागिरांच्या हक्कांवर गदा आल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आली.

कृष्णराज महाडिक यांनी या विषयाचे महत्व आणि गांभीर्य मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडले. अशा पध्दतीने कोल्हापूरी चप्पलच्या कायदेशीर आणि मुलभूत हक्कांवर गदा येत असल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने तातडीने केंद्र सरकार मार्फत कायदेशीर कारवाईसाठी पावलं उचलावीत आणि कोल्हापूरी चर्मकार बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी कृष्णराज महाडिक यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने याप्रश्‍नी कायदेशीर पावले उचलणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या विशेष कार्यकारी अधिकार्‍यांना याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी काय करता येईल, याबाबत माहिती घेण्यास सांगितले. कृष्णराज महाडिक यांनी, कोल्हापूरच्या चप्पल कारागिरांना सोबत घेवून, या महत्वाच्या विषयावर थेट भुमिका मांडली. त्याबद्दल कोल्हापुरातील चर्मकार बांधवांनी कृष्णराज महाडिक यांचे आभार मानले आहेत.