कोल्हापूर लोकसभेसाठी व्ही.बी. पाटील तर हातकणंगले मधून प्रतीक पाटील यांच्या साठी कार्यकर्त्यांचा जोर

कोल्हापूर लोकसभेसाठी व्ही.बी. पाटील तर हातकणंगले मधून प्रतीक पाटील यांच्या साठी कार्यकर्त्यांचा जोर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर लोकसभा व हातकणगले लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांना तर हातकणंगले मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील बैठकीत केली.

 मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठकीचे आयोजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.   

     यावेळी प्रथम कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला असता सर्व तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष व इतर मान्यवरांनी 2024 च्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी फार पोषक व चांगले वातावरण असून पवार साहेबांना मानणारा ज्येष्ठांसह युवकांचा देखील मोठा वर्ग आहे. त्यामुळे कोल्हापूर व हातकणगले या दोन्ही मतदार संघासाठी राष्ट्रवादीचेच उमेदवार असावेत अशी मागणी करण्यात आली. त्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व मान्यवरांनी कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांच्या नावाला सर्वांनी एक मताने पसंती दर्शवली. 

 व्ही.बी.पाटील हे जिल्हास्तरावर सर्वाँना परिचित असणारी व्यक्ती असून त्यांचे आघाडीतील काँग्रेस व उद्धव ठाकरे शिवसेना या मित्र पक्षासह इतर पक्षाबरोबर देखील चांगले संबंध आहेत. त्याचबरोबर ते बऱ्याच सामाजिक संस्थांमध्ये देखील कार्यरत आहेत. यामुळे पक्षात पवार साहेबांचे अगदी निष्ठावंत व्ही.बी.पाटील यांच्या उमेदवारी शिवाय दुसऱ्या पर्यायच नाही.  

तसेच हातकणगले मतदार संघासाठी देखील सांगलीच्या दोन्ही तालुक्यासह कोल्हापूरच्या चारही तालुक्याच्या शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष,पदाधिकारी व इतर मान्यवर यासर्वांनी जयंत पाटील यांचे चिरंजीत प्रतीक पाटील यांच्या नावाला पसंती दर्शविली. हा मतदार संघ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या साठी सोडण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी देखील करण्यात आली.

यावर प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी बोलताना सांगितले की, पक्षामार्फत केला जाणाऱ्या सर्वे मध्ये राष्ट्रवादीस व पवार साहेबांना मानणारा वर्ग मोठा असल्याचे निदर्शनास आले आहे. आजच्या या आढावा बैठकीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी व्ही.बी. पाटील यांचे व हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी प्रतीक पाटील यांचे नाव सर्वांनी सुचवले असून त्याबाबतचे सर्व अधिकार पवार यांचे कडे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे याचा निर्णय पवार घेतील. त्यासाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या दोन्ही जागा राष्ट्रवादीस मिळतील यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी केले. 

तसेच याबैठकीत कोल्हापूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी अनिल घाटगे व हातकणंगले लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण कार्याध्यक्षपदी रावसाहेब भिलवडे यांची तर इचलकरंजी शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी नितीन जांभळे नियुक्तीची पत्रे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

यावेळी, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर सह प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

कोल्हापुरातून शहराध्यक्ष आर.के.पोवार, माजी आमदार राजीव आवळे, अनिल घाटगे, सुनील देसाई, नितीन भाऊ पाटील, गणेश जाधव, नितीन जांभळे, मदन कारंडे, महिला शहराध्यक्ष पद्मा तिवले, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, गडहिंग्लजचे अमर चव्हाण, शिवाजी खोत, तालुकाध्यक्ष करवीर श्रीकांत पाटील, पंडित कळके, राजाराम कासार, गगनबावडा अध्यक्ष प्रकाश पाटील, कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, चंदगड तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, आजरा तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, शिरोळ तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, अभिजित पवार, तानाजी आलासे, संदीप बिरणगे, इत्यादींसह इतर पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.