सिद्धनेर्ली दलितांवरील अत्याचार, पत्नीचे ड्रग्स प्रकरण, शाहु दूध संघ विकून मोडून खाल्ला या प्रश्नांवर समरजीत घाटगे यांची दातखिळी बसली काय?- शितल फराक
आजरा (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिद्धनेर्ली ता. कागल येथील दलित समाजाला दिलेली साडेपाच एकर जमीन समरजीत घाटगेनी दहशत व दडपशाहीने काढून घेतली. तब्बल २० लाख रुपये देऊन मिटविलेले त्यांच्या पत्नीचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरण. तसेच; स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी काढून दिलेला शाहू दूध संघ विकून मोडून खाल्ल्याप्रकरणी आम्ही त्यांना सवाल विचारलेत. या प्रश्नांवर समरजीत घाटगे यांची दातखिळी बसली काय? असा करडा सवाल राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शितल फराकटे यांनी केला.
भादवन ता. आजरा येथील जाहीर सभेत सौ. फराकटे बोलत होत्या. गावच्या प्रवेशद्वारापासून सभास्थळ्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घालून मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रचंड उत्साहामध्ये गावकऱ्यांनी घोषणा देत स्वागत केले. तर महिलांनी पंचारती घेऊन मंत्री मुश्रीफ यांचे औक्षण केले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, हा मतदारसंघ कागल विधानसभा मतदार संघाला जोडण्यापूर्वी या भागाचे नेते स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी विकासाचा पाया घातला होता. त्यावर आज कळस चढवण्याचे काम केले आहे. या गावाला आणि परिसराला जोडणारे सर्व रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, विविध शासकीय योजना राबवण्यामध्ये आपण गेल्या दहा वर्षांमध्ये यशस्वी झालो आहे. याहूनही अधिक चांगला विकास करण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांनी संधी द्यावी. गेल्या दोन वेळच्या निवडणुकीमध्ये आपण मला चांगले मताधिक्य दिले आहेच, यावेळीही चांगले मताधिक्य या परिसरातून मला मिळणार आहे. याची खात्री आहे. आपण सर्वांनी एकजुटीने माझ्या विकासकामांचा प्रचार आणि प्रसार करून प्रत्येक मत आणि मत मला मिळवून द्यावे, अशी विनंतीही मंत्री मुश्रीफ यांनी केली.
*दलितांना बेसहारा भूमिहीन करून देशोधडीला लावले......!*
सौ. फराकटे म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली ही जमीन दलित समाजाकडून काढून घेताना समररजीत घाटगे अत्यंत निष्ठूर आणि क्रूर वागले. शेतकऱ्यांसह दलित माता -भगिनींनाही त्यांनी पोलिसांकरवी तुरुंगात डांबायला कमी केले नाही. दलित समाजाचे संसार उध्वस्त करून त्यांच्या पोरा -बाळांच्या तोंडचा घास काढून घेऊन कसला शाश्वत विकास साधायला चालला आहात? असा सवालही त्यांनी केला.
आण्णा-भाऊ उद्योग समूहाचे नेते अशोक चराटी, विजय काळे, मराठा स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताजीराव देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.
आजरा साखर कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, काशिनाथ तेली, शिरीष देसाई, दीपक देसाई, बी. टी. जाधव, संजय गाडे, डॉ. केसरकर, राजेश जोशीलकर, विजय माने, संजय केसरकर, सदाशिव पाटील, बाळासाहेब डोंगरे आदी उपस्थित होते.