क्रिएटिव्ह टीचर्स फोरमला ६७ शाहूग्रंथ भेट; डॉ. जे.के पवार यांचा उपक्रम

क्रिएटिव्ह टीचर्स फोरमला ६७ शाहूग्रंथ भेट; डॉ. जे.के पवार यांचा उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, अर्थतज्ञ व राजर्षी शाहू कार्याचे अभ्यासक, अर्थायनकार प्राचार्य डॉ. जे. के. पवार सन २००७ पासून गेली १८ वर्षे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रंथदान उपक्रम राबवित आहेत. हे वर्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष असल्याने डॉ. पवार यांनी त्यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त "राजर्षी शाहूंची वाड्•मयीन स्मारके" हा बृहद्ग्रंथ जिल्ह्यातील ६७ शाळांमध्ये पोहचविण्याचा संकल्प केला.

सदर संकल्पनेतून क्रिएटिव्ह टीचर्स फोरमकडे यावर्षी ६७ शाहू ग्रंथ डॉ. पवार यांनी सुपूर्द केले. राजोपाध्येनगर येथील राजर्षी शाहू अध्यासनामध्ये संपन्न झालेल्या ग्रंथदान कार्यक्रमामध्ये फोरमचे सदस्य दीपक जगदाळे, संजय कळके, विजय एकशिंगे, महेश सूर्यवंशी, आर. बी. पाटील, अतुल शिंदे आदी उपस्थित होते. 

यापूर्वी डॉ. पवार यांनी कोल्हापूर, कुरुकली, वारणानगर, वडणगे, कोतोली, कोडोली, वाशी, शिरगांव (जि. सांगली) अशा गावातील सार्वजनिक ग्रंथालयांना आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रंथदान केले आहे. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत त्यांनी १०५३ ग्रंथ भेट दिले आहेत. यामध्ये थोरामोठ्यांची चरित्रे, गौरवग्रंथ, स्मारकग्रंथ, कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, स्पर्धा परिक्षेस उपयुक्त पुस्तके आणि संकीर्ण स्वरुपातील पुस्तकांचा, ग्रंथाचा समावेश आहे.