शिक्षकांना त्रास देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करा

शिक्षकांना त्रास देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुकतेच जाधववाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये काही समाजकंटकांनी गीत म्हणण्यावरून गोंधळ घातला. शाळा कॉलेजमध्ये जाऊन शिक्षकांना धर्माच्या नावावर टार्गेट करणे हे काम सध्या कोल्हापुरात सुरू असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलना द्वारे करण्यात आला. अशा समाजकंटकांचा  बंदोबस्त करावा आणि शाळा मधून संविधानाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आम्ही भारतीय लोक आंदोलन शिवाजी पेठ यांच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी कांबळे यांना केली.

   विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांचा अपमान करणे योग्य नाही. शाळा किंवा शिक्षिका संबंधी कोणतीही तक्रार असेल तर त्यांनी शिक्षणाधिकारी किंवा प्रशासकाशी संपर्क करावा. असे अनिल चव्हाण यांनी यावेळी सांगितले. 

 कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी भारतीय संविधानाची अंमलबजावणी शाळांमधून करण्याची मागणी केली. "शाळांचे संचलन आणि शिक्षकांचा पगार भारतीय संविधानानुसार मिळतो. भारतीय संविधानाला समोर ठेवूनच शाळांचा अभ्यासक्रम तयार केला जातो. पण संविधानाची माहिती शिक्षकांना असत नाही. प्रत्येक शाळेमध्ये संविधानाची प्रत ठेवावी आणि रोज शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्याचे वाचन करावे" असेही ते म्हणाले. 

     प्राध्यापिका तेजस्विनी देसाई यांनी "शाळांमधून धार्मिक आणि देव देवतांची गीते शिकवू नयेत, त्या ऐवजी देशभक्तीपर, तसेच धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, वैज्ञानिक दृष्टिकोन, यावर आधारित गीते आणि प्रार्थना घ्याव्यात" अशी मागणी केली.

  आनंदराव चौगुले यांनी "शाळांच्या सहली तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी काढू नयेत. उद्योगधंदे, निसर्गरम्य परिसर, ऐतिहासिक स्थळे, यांना भेटी देण्यासाठी काढाव्यात" असे सांगितले.

     जाधववाडी मधील प्रकरणाबाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजेंद्र खदरे यांनी केली. यावेळी जयवंत मिठारी, अशोक चौगुले, भीमसेन भेंडीगिरी, सोमनाथ ऐवळे, अमर जाधव,यांनीही आपली मते मांडली.

    प्रशासन अधिकारी कांबळे यांनी सकारात्मक भूमिका घेत आपण यासंबंधीचे सर्क्युलर काढत असल्याचे म्हटले." सहली काढताना धार्मिक स्थळ ऐवजी ऐतिहासिक स्थळांना आणि उद्योगधंद्याला भेटी देण्याची सूचना करू; भारतीय संविधानाची प्रत प्रत्येक शाळेमध्ये ठेवण्याची व्यवस्था करू; शिक्षकांना त्यांचे वाचन करायला सांगू; वादग्रस्त गीते शाळा मधून दूर करू;" अशी आश्वासने त्यांनी यावेळी दिली.

      धर्मांध गुंड शाळांना त्रास देऊ लागले तर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आम्ही भारतीय लोक आंदोलन यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.