गांधीनगरला राष्ट्रीय स्तरावरील सुसज्ज व्यापारी पेठ बनवू- खा. धनंजय महाडिक
कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर ला सर्व समस्येतून बाहेर काढून राष्ट्रीय स्तरावर सुसज्ज व्यापारी पेठ बनवू असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक गांधीनगर येथील सभेत केले. महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, गांधीनगरातील अंतर्गत रस्ते, गटर्स, विद्युतीकरण, खुली जागा विकास, काँक्रीटीकरण, रस्ते मुरुमीकरण, खुली सभागृहे, अशा विविध विकासकामांचा दोन वर्षांपूर्वी नारळ फोडण्यात आला होता. पण प्रत्यक्षात या कामांचा पत्ताच नाही. गांधीनगर पाणीपुरवठा योजना देखील पूर्णत्वास नेण्याची आश्वासने दिली गेली पण आता लोकसंख्या वाढीमुळे या नळ पाणीपुरवठा योजनेवर ताण पडत आहे. या योजनेच्या भविष्यात विचार करणे आवश्यक होते, पण यातल काहीच झालं नाही.
ते पुढे म्हणाले, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच काँग्रेस चे आजवरचे सूत्र राहिले आहे. मात्र ते रोखण्याचे काम आणि मूलभूत विकास करण्याची सुरुवात अमल महाडिक यांनी केली. शहरी आणि ग्रामीण असा सविस्तर मतदार संघ असलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघात सातत्याने संपर्कात राहून अमल महाडिक यांनी इथले प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
ते म्हणाले, गांधीनगर पाणी पुरवठा योजना अमल महाडिक यांनीच त्यांच्या कार्यकाळात मंजूर करून आणली होती. पण योजनेच्या उद्घाटनाचा नारळ फोडून हे श्रेय लाटण्याचं काम विद्यमान आमदारानी केलं. आजही वाहतुकीची समस्या, रस्ते, बाजारपेठ अशा महत्वाच्या बाबींकडे लक्ष वेधून प्राधान्याने या समस्या सोडवण्यासाठी अमल महाडिक यांना आपल्या मतांचे बळ द्या, असे आवाहन धनंजय महाडिक यांनी यावेळी केले.
याप्रसंगी या सभेला गांधीनगर येथील बीएसएस ग्रुप, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच गांधीनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.