गेल्या १५ वर्षात भागीरथी महिला संस्थेने हजारो महिलांना स्वावलंबी बनवलं - अरुंधती महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महिलांच्या अंगी उपजत उद्योग व्यवसायाची क्षमता असते. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन मिळाले, प्रशिक्षण मिळाले, तर या महिला कुटुंबाबरोबरच जिल्ह्याचे अर्थकारण बदलू शकतात. हा विश्वास मनामध्ये घेऊन, कोल्हापुरात २३ जुलै २००९ रोजी भागीरथी महिला संस्थेची स्थापना झाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या खांद्याला खांदा लाऊन, सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या अरुंधती महाडिक यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भागीरथी महिला संस्थेने गावागावात बचत गटाच्या महिलांना एकत्र केले आणि महिला सबलीकरणाच्या प्रवासाला सुरवात झाली. गेल्या १५ वर्षात भागीरथी महिला संस्थेने शेकडो उपक्रम राबवत, हजारो महिलांना स्वावलंबी, सक्षम, उद्योजिका आणि ज्ञानसमृध्द बनवले आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अरुंधती महाडिक यांनी पुढे बोलताना भागीरथी महिला संस्थेच्या १५ वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्याचबरोबर भागीरथी संस्थेमार्फत केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याबद्दलची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आतापर्यंत १५०० हून अधिक योग शिबिरे घेण्यात आली. त्यातून समाजाच्या आरोग्यदायी भविष्याकडे कृतीशिल पावले उचलण्यात आली.
तसेच भागीरथीच्या वतीनं अनेक प्रेरणादायी व्याख्यानं, मार्गदर्शनपर कार्यक्रम, यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात घेण्यात आल्या. त्यामधून रोजचा दिनक्रम कसा असावा, आहार-विहार कसा असावा, जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणती सुत्रं अवलंबावीत, येणार्या समस्यांना सामोरे कसे जावे, याबाबत डॉक्टर्स, यशस्वी उद्योजिका, डायटेशियन, अभिनेत्री यांची व्याख्याने आणि चर्चासत्रे घेण्यात आली. आहार तज्ञ ऋतुजा दिवेकर यांच्यासारख्या नामवंत आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाचा फायदा महिला वर्गाला निश्चितच झाला.
त्याशिवाय भिमा कृषी प्रदर्शनामध्ये दररोज १० हजार शेतकर्यांना मोफत झुणका भाकर वाटप करण्यात आले. या उपक्रमाचीही सर्वत्र विशेष प्रशंसा झाली. तसेच खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीतर्फे घेतल्या जाणार्या दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणार्या गोविंदांना भागीरथी महिला संस्थेतर्फे चपाती- भाजी बनवून देण्यात येते. पर्यावरणाचे भान राखत दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संस्थेच्या वतीने केला जातो.
तसेच महिलांसाठी भाषा कौशल्य मार्गदर्शनपर शिबीरे घेतली जातात. दरवर्षी महिला दिनानिमित महिलांसाठी मार्गदर्शन शिबीरे घेवून त्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर नवरात्रीच्या काळात महिलांसाठी नवदुर्गा दर्शनाचा उपक्रमही संस्थेने पार पाडला आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी मोफत विमा योजना राबवण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी चारा आणि धान्य मदतीचा उपक्रम राबवण्यात आला. पंचगंगा स्मशानभूमी मध्ये शेणी दान उपक्रमही राबवण्यात आला.
१५ वर्षांचा टप्पा पूर्ण करताना भागीरथी संस्थेने कार्यविस्तार आणि संस्था विस्तार केला आहे. त्याद्वारे भागीरथी युवती मंच, भागीरथी वाचनालय, भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था अशा नव्या संस्था उदयाला येवून, उत्तम कारभार करत आहेत. भागीरथी युवती मंचद्वारे स्वसंरक्षण, आत्मनिर्भरता, कला-क्रीडा गुणांचा विकास, आरोग्य संवर्धन आणि सामाजिक जाणीवेबाबत प्रशिक्षण आणि जनजागृती केली जात आहे.
भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेने जिल्हयातील अनेक गरजू कुटूंबांना अर्थ सहाय्य करून, त्यांना व्यापार, उद्योग आणि व्यवसायासाठी पाठबळ दिले आहे. परिणामी जिल्हयातील असंख्य महिला आज विविध उद्योग - व्यवसाय यशस्वीरित्या चालवत आहेत. तर अनेक महिलांनी आपापल्या परिसरात छोट्यामोठ्या संस्था काढून त्या उत्तमरित्या चालवल्या आहेत. त्या महिलांनी भागीरथी महिला संस्थेपासूनच प्रेरणा घेतली आहे. तर भागीरथी महिला संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिला आता स्वत: प्रशिक्षीका बनून इतर महिलांना उद्योग व्यवसायाबाबत मार्गदर्शन करत आहेत. तर अनेक महिलांनी आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास करत समाजकारण आणि राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. विविध पक्षांच्या पदाधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत.
भागीरथी महिला संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत सर्व वाटचालीमध्ये आणि उपक्रमांना खासदार धनंजय महाडिक यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे. वेळोवेळी विविध कार्यक्रमांसाठी मार्गदर्शन आणि आर्थिक मदतही करून, त्यांनी भागीरथी संस्थेला अधिक उंचीवर नेण्याचं काम केलंय. भविष्यात खासदार महाडिक यांच्या पाठबळावर आणि मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरू राहणार आहे.
आता त्यापुढे एक पाऊल टाकून भागीरथी संस्थेने स्वतःची वेबसाईट, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम आणि युटयूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोशल मीडियाद्वारे महिलांचे प्रबोधन, त्यांचे सक्षमीकरण आणि जगभर महिलांनी केलेल्या विविध क्षेत्रातील यशस्वी कामगिरीची माहिती महिलांपर्यंत पोचवण्याचा संस्थेचा मानस आहे. तसेच या वर्षभरात महिलांसाठी आरोग्य विषयक, बौध्दीक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक आणि सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे अरूंधती महाडिक यांनी सांगितले. जिल्हयातील महिलांनी व्यवसाय विषयक मार्गदर्शनासाठी रवी पाटील ९६ ७३ ८१ ९२ ९२ किंवा भागीरथी पतसंस्थेच्या सुप्रिया चौगले यांच्या ८४० ९९ ७५० ५० या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन अरूंधती महाडिक यांनी केले.
या पत्रकार परिषदेला वैष्णवी महाडिक, अंजली महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, शरयू भोसले यांच्यासह आदी उपस्थित होत्या.