जिल्ह्यातील खेळाडूंना प्रमाणपत्रांचे वितरण कार्यक्रम संपन्न

जिल्ह्यातील खेळाडूंना प्रमाणपत्रांचे वितरण कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अभिनव मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांतील जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. 

21 ते 29 जून 2025 या कालावधीत इचलकरंजी व कोल्हापूर मनपा, राधानगरी, भुदरगड, शिरोळ, शाहुवाडी, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल व पन्हाळा या तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी शिबीरे आयोजित करण्यात आली. या शिबीरांमध्ये जिल्ह्यातील सुमारे 500 शाळांमधील 3 हजार 500 हून अधिक खेळाडूंना जिल्हास्तर, विभागीय व राज्यस्तर स्पर्धांमध्ये सहभागाबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

उपक्रमादरम्यान खेळाडूंना केवळ सन्मान नव्हे तर प्रोत्साहन आणि पुढील वाटचालीसाठी बळ मिळाल्याचे संबंधित शाळांतील शिक्षकांनी नमूद केले. या उपक्रमामध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक, मुख्याध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यातर्फे आयोजित या उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये अभिमान आणि प्रोत्साहनाची भावना निर्माण झाली आहे.

यानंतरचे प्रमाणपत्र वितरण शिबीर जिल्हास्तरावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे 30 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत होणार असून ज्या शाळांनी अद्याप प्रमाणपत्र स्वीकारली नसतील, त्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.