पुरातून दूध वाहतुकीबद्दल गोकुळच्या संचालकांचा सत्कार

पुरातून दूध वाहतुकीबद्दल गोकुळच्या संचालकांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधि) : स्वतः पुराच्या पाण्यात उतरून दूध वाहतूक सुरळीत केल्याबद्दल 'गोकुळ'च्या संचालक मंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, प्रा. किसन चौगले, डॉ. चेतन नरके व बाळासाहेब खाडे यांचा सत्कार अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.

मागील आठवड्यात जिल्ह्यात धुवाधार पाऊस कोसळल्याने सर्वच नद्यांना पूर आला. यामध्ये जिल्ह्यातील बहुतांशी मार्ग बंद राहिले होते. त्यामुळे दूध वाहतुकीवर परिणाम झाला होता. दूध उत्पादकांचे नुकसान होऊ नये, म्हणून पर्यायी मार्गाने दूध वाहतूक सुरू होती. पण, काही ठिकाणी तीन-चार फूट पाणी असल्याने वाहनचालक धाडस करत नव्हते.

पन्हाळा, करवीर व राधानगरी तालुक्यांतील पाण्याखाली गेलेल्या मार्गावर उतरून दुधाचे टेम्पो चिलिंग सेंटरपर्यंत पोहोचविल्याबद्दल चौधा संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व संचालकांसह कार्यकारी संचालक गोडबोले होते.