बालिंगा पुलावरून सायंकाळपर्यंत वाहतूक सुरु होण्याची शक्यता

बालिंगा पुलावरून सायंकाळपर्यंत वाहतूक सुरु होण्याची शक्यता
वाहतूक सुरु करण्यासंदर्भात चंद्रदीप नरके यांनी घेतली पालकमंत्री केसरकर यांची भेट

बालिंगा / प्रतिनिधी  

करवीर तालुक्यातील बालिंगा येथील भोगावती नदीवरील पूल धोकादायक असल्याने प्रशासनाने कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील वाहतूक बंद केली आहे. यामुळे जनतेची मोठी गैरसोय होत आहे. हे लक्षात घेऊन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुंबईत पालकमंत्री दीपक केसरकर यांची बुधवारी रात्री भेट घेऊन वाहतूक चालू करण्यासंदर्भात चर्चा केली. 

जनतेची गैरसोय होत असल्याने पादचारी, रुग्णवाहिका, मोटरसायकल आणि लाईट वेट वाहन चालू करावे अशी मागणी यावेळी नरके यांनी केली. यासंदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासोबत मीटिंग घेऊन आणि पाणी पातळी तसेच पुलाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे कळविले आहे.

सध्या राधानगरी धरणाची पाच दरवाजातून विसर्ग सुरू होता, परंतु आज सकाळी एक दरवाजा बंद झाल्याने राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी आणि कोगे धरणाची पातळी स्थिर आहे. त्यामुळे दुपारच्या बैठकीनंतर आज सायंकाळपर्यंत कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल अशी माहिती चंद्रदीप नरके यांनी दिली आहे.