पाकच्या लगत असणाऱ्या राज्यांमध्ये सरकार उद्या 'ही' मोहीम राबवणार

पाकच्या लगत असणाऱ्या राज्यांमध्ये सरकार उद्या 'ही' मोहीम राबवणार

नवी दिल्ली - भारत - पाकिस्तान सीमेवर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर उद्या, २९ मे रोजी गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू - काश्मीर या चार राज्यांमध्ये मॉक ड्रिल (सुरक्षा सराव) राबवण्यात येणार आहे. याबाबत केंद्र सरकारकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. ही मॉक ड्रिल ऑपरेशन सिंदूरनंतरची पहिली मोठी सुरक्षा चाचणी ठरणार आहे. ६ मे रोजी रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत ९ तळ उद्ध्वस्त केले होते. हे ऑपरेशन अवघ्या २५ मिनिटांत पूर्ण झाले होते.

या आधी ७ मे रोजी देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता सीमावर्ती राज्यांमध्ये पुन्हा सुरक्षा चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच काही मोठी कारवाई होण्याची शक्यता असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत - पाक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. सीमेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार होतो आहे. अशा पार्श्वभूमीवर ही मॉक ड्रिल अधिक महत्त्वाची मानली जात आहे.

२९ मे च्या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची तयारी, आपत्ती व्यवस्थापन, आणि आपत्कालीन प्रतिसाद यांचा आढावा घेतला जाणार आहे. नागरी सुरक्षेच्या दृष्टीने ही मॉक ड्रिल महत्त्वाची असून नागरिकांनी सतर्क राहावं, अफवांवर विश्वास न ठेवावा आणि गोंधळून न जाता सहकार्य करावं, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

सिव्हिल डिफेन्सच्या या सरावामुळे नागरिकांना संकटाच्या काळात योग्य कृती कशी करावी, काय टाळावं, आणि इतरांना मदत कशी करावी याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. युद्धजन्य किंवा आपत्तीच्या प्रसंगी अशी मॉक ड्रिल अत्यंत उपयोगी ठरते.