भान सुटलेल्या आबिटकरांनी स्वतःची थेट मोदींशी तुलना करणे शोभते का ?मतदारच तुमची गॅरंटी कालबाह्य करतील : के पी पाटील यांचा हल्लाबोल
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ही निवडणूक वाराणशी लोकसभा मतदारसंघाची नसून राधानगरी विधानसभा मतदारसंघाची आहे याचे भान सुटलेल्या आमदार आबिटकरांना गर्व झाला असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटी सोबत ते स्वतःच्या गॅरंटीची तुलना करीत आहेत. परंतु अख्या देशभर ज्या पंतप्रधानांची गॅरंटी चालली नाही तेथे तुमच्या गॅरंटीची डाळ अजिबात शिजणार नाही. मतदारच यावेळी तुम्हाला पराभूत करून तुमची गॅरंटी कालबाह्य करणार असल्याचा हल्लाबोल माजी आमदार के पी पाटील यांनी केला.
राधानगरी तालुक्यातील कासारवाडा, कासारपुतळे येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
के पी पाटील पुढे म्हणाले, "या मतदारसंघाचे अनेक दिग्गजांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केले आहे; परंतु अशी गॅरंटीची गर्वाची भाषा कोणीही वापरलेली नाही. मात्र विद्यमान आमदार जशी मोदींची गॅरंटी चालते तशी आपली गॅरंटी या मतदारसंघात चालणार अशी गर्वाची भाषा करीत आहेत. हात आभाळाला टेकण्याच्या नादात त्यांचे पाय मात्र जमिनीवर राहिलेले नाहीत हेच त्यांच्या भाषेतून मतदारांना जाणवत असून स्वर्ग दोन बोटे उरलेल्या अविर्भावात ते स्वतःचा प्रचार करीत सुटले आहेत. अगदी पुरातन काळापासून ज्या भारत भूमीत अनेकांचे गर्वहरण झाले तेथे महाराष्ट्रातील एका आमदाराला अशी गर्वाची भाषा शोभून दिसत नाही. मतदार संघातील जनतेच्या हितापेक्षा तुमची दहा वर्षांतील वैयक्तिक संपत्ती वाढविण्यामागची तळमळ आता जनतेने ओळखली असून मतदारांना तुमची गॅरंटीची भाषा रुचलेली नाही. पराभव समोर दिसू लागल्यामुळे स्वतःचाच आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही गॅरंटी गॅरंटीचा जप करीत असलात तरी या निवडणुकीत तुमचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे."
जनता दलाचे नेते शरद पाडळकर म्हणाले," ही लढाई खऱ्या - खोट्याची असून विद्यमान आमदारांचा दहा वर्षांचा निकृष्ट विकासाचा कारभार पाहिल्याने सर्वसामान्य मतदार के पी पाटील यांच्या बाजूने पुन्हा उभा राहिला आहे."
संजय पाडळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी दूध संघाचे संचालक आर के मोरे, 'बिद्री'चे संचालक राजेंद्र पाटील, शिवसेनेचे नेते सुरेश चौगले,रणजीत बागल आदींची भाषणे झाली.
यावेळी मसू तोरस्कर,राहुल देसाई,वसंतराव पाटील, भिकाजी एकल,फत्तेसिंह भोसले,एकनाथ पाटील, शामराव देसाई,वैभव तहसीलदार आदींसह नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. सरपंच कोमल पाडळकर यांनी आभार मानले.
सभेपूर्वी मालवे,सरवडे,सावर्डे, पंडेवाडी,ढेंगेवाडी,ऐनी,आटेगाव, पनोरी,फराळे,बुजवडे, मल्लेवाडी या गावांचा प्रचारदौरा झाला.
*तुमच्या विकासकामांच्या दर्जाची गॅरंटी आहे काय ?*
स्वतःची गॅरंटी देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विकास कामांच्या दर्जाची गॅरंटी दिली असती तर जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतले असते; परंतु तुम्ही केलेल्या अत्यंत निकृष्ट कामांमुळे मतदारसंघाच्या समस्या सुटलेल्या नाहीत. आजच्या घडीला तुम्ही विकासकामांच्या दर्जाची गॅरंटी देऊ शकता का ? असा सवाल के पी पाटील यांनी सभेत विचारताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.