मराठी पत्रकारितेचे जनक 'बाळशास्त्री जांभेकर' : पत्रकार दिन विशेष
माझा महाराष्ट्र ऑनलाईन : 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे श्रेय जाते बाळशास्त्री जांभेकर यांना. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला.
बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवनप्रवास
बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी कोकणातील एका सामान्य कुटुंबात झाला. केवळ 34 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बाळशास्त्रींनी आपल्या छोट्या आयुष्यात समाज जागृतीचा मोठा वारसा निर्माण केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू, विद्वान आणि विचारशील होते. वयाच्या विसाव्या वर्षीच ते प्राध्यापक झाले आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले समर्पित व्याख्याता म्हणून नियुक्त झाले.
‘दर्पण’ची सुरुवात
1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. हे वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी अशा जोडभाषांमध्ये प्रकाशित होत असे. मराठी लोकांना देशात चाललेल्या घडामोडी समजाव्यात आणि इंग्रजांना वृत्तपत्रातील आशय कळावा, यासाठी हे दुहेरी स्वरूप ठेवले गेले. ‘दर्पण’मध्ये दोन स्तंभ असत, एक मराठीत आणि दुसरा इंग्रजीत.
आद्य समाजसुधारक
‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजातील अनेक गंभीर विषयांवर लिखाण केले. जातीयवाद, अस्पृश्यता, सतीप्रथा, बालविवाह आणि स्त्रियांवरील अन्याय यांसारख्या विषयांवर त्यांनी जनजागृती केली. त्यामुळेच त्यांना ‘आद्य समाजसुधारक’ही म्हटले जाते. ‘दर्पण’चा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रसिद्ध झाला. हे वृत्तपत्र साडेआठ वर्षे चालले आणि त्याचा शेवटचा अंक जुलै 1840 मध्ये प्रकाशित झाला. ब्रिटिश राजवटीत चालवलेल्या या वृत्तपत्राने अनेक अडचणींचा सामना केला, परंतु तरीही आपल्या उद्दिष्टांवर ठाम राहिले.
तब्बल दहा भाषांवर प्रभुत्व
बाळशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकार नव्हते तर ते बहुभाषाविद होते. मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कन्नड, तेलुगू, पर्शियन, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक अशा दहा भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. भाषांव्यतिरिक्त विज्ञान, गणित, भूगोल आणि शरीरशास्त्र यांसारख्या विविध विषयांवरही त्यांचे गाढे ज्ञान होते.‘दर्पण’ हे वृत्तपत्र केवळ माहिती देण्याचे माध्यम नव्हते तर ते एक समाजजागृतीचे व्यासपीठ होते. बाळशास्त्रींच्या विचारांचा प्रभाव आजही मराठी पत्रकारितेत जाणवतो. अशा या मराठी पत्रकारितेचा पाया रचणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वास कोटी कोटी प्रणाम.