बोर्डाची परीक्षा आली जवळ,अजूनही झाला नाही अभ्यास? मग असा करा अभ्यास

बोर्डाची परीक्षा आली जवळ,अजूनही झाला नाही अभ्यास? मग असा करा अभ्यास

निसार मुल्ला, (कापशी)

इयत्ता नववी आणि अकरावीचा निकाल लागला आणि विद्यार्थी एकदा का दहावी, बारावीच्या वर्गात गेले की त्याच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा सुरू होतो. वर्षभराचे वेळापत्रक, रोज सातत्याने अभ्यास, सराव, प्रॅक्टिकल्सची तयारी, मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे असा सगळा दिनक्रम सुरू होतो. पण काही विद्यार्थ्यांकडून वर्षभर म्हणावा तसा सातत्यपूर्ण अभ्यास होत नाही. कोणत्यातरी कारणामुळे या विद्यार्थ्यांची तयारी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी पडते. अशा परिस्थितीत दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी अवघे दीड दोन महीने शिल्लक असताना परीक्षांचा अभ्यास कसा करायचा, चांगले मार्क पडतील का ? याचा ताण या विद्यार्थ्यांवर येतो. 

दहावी ,बारावी हे वर्ष प्रत्येक विद्यार्थ्याच्या शालेय आयुष्यातील महत्वाची वर्षे असतात. काही विद्यार्थी चिकाटीने वर्षभर अभ्यास करतात तर काही जण या तयारीत कमी पडतात. त्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणात, कमी कालावधीत जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा? याच्या महत्वपूर्ण टिप्स 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या' माजी अध्यक्षा शकुंतला काळे यांनी एका शैक्षणिक कार्यक्रमात बोलताना दिल्या. 

प्रश्न : जर एखाद्या विद्यार्थ्याला वर्षभर सतातत्याने अभ्यास करता आला नसेल, तर अशा विद्यार्थ्याने शेवटच्या दीड दोन महिन्यात परीक्षेची तयारी काशी करावी?

शकुंतला काळे : " मुळात आपण सुरुवातीपासून मुलांना सातत्यपूर्ण अभ्यासावर भर देण्यास सांगत असतो. शाळांमधूनही तसाच प्रयत्न केला जात असतो. तरीपण एखाद्या विद्यार्थ्याची तयारी पूर्ण झाली नसेल. तर त्याने आता शेवटच्या दिवसांमध्ये अभ्यासाचा ताण न घेता, काही महत्वाच्या गोष्टी पाळल्या तर तो विद्यार्थी देखील परीक्षेत बर्‍यापैकी गुण मिळवू शकतो. वर्गात शिक्षक शिकवत असताना प्रत्येक विषयातील महत्वाचे धडे, महत्वाचे प्रश्न याबद्दल सांगत असतात. प्रत्येक विषयातील अशा धड्यांना, प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे. या प्रश्नांच्या उत्तरांची तयारी चांगल्या पद्धतीने करून घ्यावी. तसेच भाषा विषयाची तोंडी परीक्षा असते विज्ञान विषयाचे प्रॅक्टिकल परीक्षा असतात. या तोंडी आणि प्रॅक्टिकल परीक्षा चांगल्या पद्धतीने देणे. याव्यतिरिक्त परीक्षेत विचारले जाणारे जे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात जसे की जोड्या लावा, एक वाक्यात उत्तरे द्या, गाळलेल्या जागा भरा. अशा प्रश्नांची तयारी व्यवस्थित करून घ्यावी. कारण या प्रश्नांना 25 टक्के गुण असतात. आणि हे प्रश्न तसे सोप्पे असतात. आधीच्या प्रश्नपत्रिका पाहून या प्रश्नांचा सराव करावा. "

प्रश्न : भाषा विषयाचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

शकुंतला काळे: "भाषा विषयाची तोंडी परीक्षा, वस्तुनिष्ठ प्रश्न यानंतर आता विद्यार्थ्यांनी उतार्‍ यांच्या भागाकडे लक्ष दिले पाहिजे. उतार्‍यांवर आकलनात्मक प्रश्न असतात. हे उतारे नीट समजून घेऊन वाचावेत. प्रश्नांची उत्तरे तिथेच असतात. फक्त ती काळजीपूर्वक वाचण्याची गरज असते."

प्रश्न : गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा अभ्यास करताना कोणती काळजी घ्यावी?

शकुंतला काळे: "गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे सरावाचे विषय आहेत. त्यातही गणित या विषयाची तयारी फक्त सरवानेच होऊ शकते. त्यासाठी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका वारंवार सोडवल्या पाहिजेत. शाळेतील परीक्षांचे पेपर, प्रीलियमचे पेपर या प्रश्नपत्रिकांचा सराव काळजीपूर्वक करावा.   

प्रश्न : आता शेवटच्या दिवसांमध्ये अभ्यास करताना कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावे? 

शकुंतला काळे: " तसे तर सगळेच विषय सोप्पे असतात. पण विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार सोप्पे आणि अवघड विषय ठरवलेले असतात. तर विद्यार्थ्यांनी त्यांना आवडणार्‍या, त्यांना सोप्या वाटणार्‍या विषयाचा आधी अभ्यास आधी करावा. त्यानंतर थोड्या अवघड विषयांकडे वळावे. हे करत असताना सुद्धा अवघड विषयतील सोप्पे प्रश्न, सोप्पे धडे असतील त्यांचापासून अभ्यासाला सुरुवात करा. म्हणजे सोप्या पासून अवघड विषयांकडे जा. सर्व विषयांचा थोडा थोडा अभ्यास करणे आवश्यक आहे."

प्रश्न : मुलांच्या अभ्यासाचे आताचे वेळापत्रक कसे असावे? 

शकुंतला काळे: " अभ्यासाचे वेळापत्रक फार महत्वाचे आहे. हे वेळापत्रक लवचिक असावे. दोन तीन दिवस लागोपाठ एकाच विषयाचा अभ्यास करणे टाळावे. म्हणजे आज चार विषयांचा अभ्यास केला तर उद्या चार विषयांचा अभ्यास करावा. हा अभ्यास करताना प्रत्येक विषयांच्या मध्ये काही वेळेचे अंतर ठेवावे. दोन विषयांच्यामध्ये 15-20 मिनिटांचे अंतर ठेवावे. या 15-20 मिनिटात मुलांनी बाहेर एखादी चक्कर मारून यावी, टीव्ही वरील एखादा आवडीचा कार्यक्रम पहावा, संगीत ऐकण, थोडा विरंगुळा होऊन पुन्हा अभ्यासाला सुरुवात केल्यास पुढच्या विषयाचा अभ्यास करताना अभ्यासात लक्षात लागेल, कंटाळा येणार नाही. अभ्यास करताना आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे या प्रक्रियेत वाचन फार महत्वाचे आहे. वाचन करत असताना एखादा महत्वाचा शब्द, संज्ञा यांची नोंद ठेवावी. या नोट्स भारंभार न काढता फक्त किवर्डसची नोंद ठेवावी. जेणेकरून परीक्षेला जाताना फक्त तेवढा शब्द किंवा संज्ञा वाचली तरी ते उत्तर लक्षात रहायल मदत होईल. एक धडा वाचून झाला की डोळे मिटून शांत बसावे आणि वाचलेले पुन्हा आठवावे यामुळे विद्यार्थ्यांचा सराव देखील होईल. अशा पद्धतीने वाचन, लेखन, मनन, चिंतन करून अभ्यास केला तर पुन्हा पुन्हा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने केलेला अभ्यास कायम लक्षात राहतो. अभ्यास करताना एकाग्रता खूप महत्वाची आहे. त्यामुळे विशेषतः परीक्षेच्या काळात मुलांनी मोबाईलपासून दूर राहावे. कारण मोबाईलमुळे मन आणि डोकं त्यातच गुंतत जाते."

"सर्वात महत्वाचे म्हणजे आता आपल्याकडे फार थोडे दिवस राहिले आहेत याचा ताण न घेता आनंदाने आणि प्रत्येक विषय, धडा समजून घेऊन, त्याचे व्यवस्थित आकलन करून अभ्यास करावा. परीक्षा म्हणजे आपल्यावर आलेले कोणतेतरी मोठे संकट आहे. या भावनेने, भीतीने अभ्यास करू नका. मुळात बोर्डाच्या परीक्षेचा फार ताण घेण्याची गरज नसते. कारण शाळेत होणार्‍या परीक्षा, प्रीलीयम्स यामुळे विद्यार्थ्यांची बर्‍यापैकी तयारी झालेली असते. आता राहिलेल्या कमी वेळेत अख्खं पुस्तक वाचून होणार नाही. त्यामुळे मुलांनी क्वालिटी अभ्यासावर भर दिला पाहिजे. जास्त वेटेज असलेले धडे, प्रश्न समजून लक्षात ठेवले पाहिजे. जो अभ्यास कराल तो व्यवस्थित करा. आता निघून गेलेल्या वेळेबद्दल विचार न करता आहे त्या वेळेत योग्य अभ्यास केला तर या परिस्थितीतही मुले चांगले गुण मिळवू शकतात."