"माझ्यावर संकट आलं, तर आजही शरद पवार धावून येतील" - मंत्री उदय सामंत

"माझ्यावर संकट आलं, तर आजही शरद पवार धावून येतील" - मंत्री उदय सामंत

रत्नागिरी - शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर भाष्य केलं. ते म्हणाले, "आजही जर माझ्यावर एखादं सकट आलं तर मला खात्री आहे की शरद पवार माझ्यासाठी धावून येतील. हेच महाराष्ट्राचं राजकीय संस्कार आहेत."

मंत्री सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही उल्लेख करत सांगितलं, "उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जरी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता मदतीसाठी गेला, तरी ते पक्ष बाजूला ठेवून त्या कार्यकर्त्याच्या मदतीसाठी पुढे येतात. हाच खरा महाराष्ट्राचा राजकीय वारसा आहे."

राजकारणातील अनुभव सांगताना मंत्री उदय सामंत म्हणाले, "आजवर मी पाच वेळा निवडणुकीत विजय मिळवला असून, अनेकांना 'नारळ' दिला आहे. काही जण मला नारळ द्यायला निघाले होते, पण मी श्रीफळ घेऊन त्यांनाही नारळ दिला. नारळ देणं आणि श्रीफळ देणं यात मोठा फरक आहे." ते पुढे म्हणाले, "माझा पक्ष कुठेही असो, पण माझ्या मतदारसंघातील, जिल्ह्यातील आणि कोकणातील जनतेला विकासाची ताकद देणं, ही माझी जबाबदारी आहे."

धामणसे हायस्कूलचे मुख्याध्यापक अविनाश जोशी यांच्या सेवानिवृत्ती समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमात बोलताना मंत्री सामंत म्हणाले, "मी भूमिपूजनासाठी जातो, तेव्हा काहीजण म्हणतात 'साहेब, नारळ फोडा', पण मी कधीही नारळ फोडत नाही तर मी नारळ वाढवतो. हेच खरे संस्कार आहेत. आणि हेच संस्कार मला गेली 25 वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात प्रामाणिक राजकारण करण्यास प्रेरणा देत आहेत असंही मंत्री सामंत म्हणाले.