वेगाने बदलणाऱ्या तंत्रयुगात अभियांत्रिकी शिक्षणाला उज्ज्वल भवितव्य : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
महाराष्ट्राची शैक्षणिक परंपरा उज्वल आहे. या परंपरेला पुढे घेऊन जाण्यात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा मोलाचा वाटा आहे. सध्या अभियांत्रिकी शिक्षणात अपरिचित आणि सर्वव्यापी तंत्रज्ञानाचा उदय होत आहे. इंजिनिअरिंग हे क्षेत्र उद्योग व अर्थव्यवस्थेशी जोडले गेले असल्याने यातून रोजगाराच्या संधींची उपलब्धता होते. वेगाने बदलणाऱ्या तंत्रयुगात अभियांत्रिकी शिक्षणाला उज्ज्वल भवितव्य आहे. संस्थेने भविष्यात पॅरा मेडिकल कोर्सेस सुरू करावेत, यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल.”असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई प्रमुख पाहुणे होते. विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री पाटील यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी जाणले होते. त्यांच्या याच विचारास अनुसरून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. या महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची पदवी मिळवण्याची एक सुवर्णसंधी मिळाली आहे, असे मत मांडले.
इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्थापनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रकाश मेडशिंगे, महेश साळुंखे, डॉ. पी. सी. भास्कर, इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य विरेन भिर्डी, अमित आव्हाड, कृष्णात इंगळे आदींचा सत्कार करण्यात आला. विवेकानंद कॉलेजमधील विद्यार्थिनी अलसाबा सय्यद हिची चीनमधील हेनॉन विद्यापीठात पीएचडी संशोधनासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार झाला.
संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाची सुरवात रोपट्यास पाणी घालून, दीपप्रज्वलनाने झाली. महेश हिरेमठ व सहकाऱ्यांनी प्रार्थना व भक्तिगीते सादर केली. प्रा. अशोक पाटील, डॉ. कविता तिवडे, प्रा. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, सहसचिव (अर्थ) सिताराम गवळी, संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, गर्व्हमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे समन्वयक डॉ. रणजित सावंत, हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य धनराज भोसले, राहुल चिकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.