Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींसाठी सरकारने लावली 'या' विभागांच्या निधीला कात्री , तब्बल 'इतका' निधी वळविला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींसाठी सरकारने लावली 'या' विभागांच्या निधीला कात्री , तब्बल 'इतका' निधी वळविला

मुंबई: आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी सामाजिक न्याय व आदिवासी विकास खात्याचा निधी वळवला आहे. सामाजिक न्याय खात्याच्या ४१० कोटी ३० लाख रुपये आणि आदिवासी विकास खात्याच्या ३३५ कोटी ७० लाख रुपये महिला व बालविकास खात्याकडे दिले गेले आहेत.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेली ही योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरली. निवडणुकीपूर्वी सरकारने पाच महिन्यांचे हप्ते वितरित केले. मात्र, निवडणुकीनंतर सरकारच्या आर्थिक स्थितीचा परिणाम योजनेवर झाला आणि दर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात विलंब होऊ लागला.

अक्षय तृतीयेच्या दिवशी एप्रिल २०२५ चा हप्ता जमा करण्याचे आश्वासन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले होते. मात्र, निधीअभावी ते शक्य झाले नाही. आता सामाजिक न्याय व आदिवासी विकास खात्याचा निधी उपलब्ध झाल्याने लवकरच हप्ता जमा होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या निधीवळवणीवर आधीच आक्षेप नोंदवला होता, मात्र सरकारकडून त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. राज्य सरकारने २०२५-२६च्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती आणि आदिवासी उपयोजनांसाठी मोठी तरतूद केली असली, तरी या घटनेवरून सरकारवर तीव्र टीका सुरू आहे.