अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, वडील अल्लू अरविंद म्हणाले...

मुंबई : अल्लू अर्जुनचा पुष्पा २ - द रूल हा चित्रपट सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट कमाईचे नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे. अशातच अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबादच्या जुबली हिल्समधील त्याच्या घरावर रविवारी, २२ डिसेंबर रोजी काही आंदोलकांनी घोषणाबाजी करत हल्ला केला. बऱ्याचजणांनी त्याच्या घरावर टोमॅटो फेकून दिले. काही आंदोलकांनी दगडफेकही केल्याचे काही वृत्तात म्हटले आहे. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी यावर मौन सोडले असून कायदा त्यांचे काम करेल असे ते म्हणाले.
प्राप्त माहितीनुसार, अल्लू अर्जुनच्या घरावर ओस्मानिया विद्यापीठ संयुक्त एक्शन समितीच्या (जेएसी) सदस्यांनी हल्ला केला होता. अभिनेता त्यावेळी घरी उपस्थित नव्हता. बराच गदारोळ झाल्यानंतर 8 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. तसेच अल्लू अर्जुनचा पुतळा जाळत असलेला आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.
काय म्हणाले अल्लू अर्जुनचे वडील ?
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हैदराबादच्या जुबली हिल्स येथील आपल्या घरातून बोलत असताना अल्लू अरविंद म्हणाले, 'आज आमच्या घरी जे काही घडले ते सर्वांनी पाहिले आहे. पण आता वेळ आली आहे की आपण त्यानुसार वागले पाहिले. आता कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची योग्य वेळ नाही.
'पोलिसांनी गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. याठिकाणी गोंधळ घालण्यासाठी आलेल्या इतर कोणत्याही व्यक्तींना पकडण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. अशा घटनांना कोणीही प्रोत्साहन देऊ नये.आता संयम बाळगण्याची वेळ आली आहे. कायदाच योग्य मार्ग दाखवेल,असेही अल्लू अरविंद म्हणाले.