आबिटकरांचा राधानगरी विधानसभा मतदारसंघात मोठा सिंचन घोटाळा : के पी पाटील यांचा घणाघात
कडगाव (प्रतिनिधी) : दहा वर्षांत विकासाच्या नावाखाली बक्कळ पैसा कमविणाऱ्या आमदार प्रकाश आबिटकरांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये करोडो रुपयांचा मोठा सिंचन घोटाळा केला असल्याचा घणाघात आमदार के पी पाटील यांनी केला.
कडगाव (ता.भुदरगड) येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले," भुदरगडच्या हरित क्रांतीचा पाया रचलेल्या माजी आमदार स्वर्गिय हरिभाऊ कडव यांनी भुदरगड तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या ज्या फये धरणाची उभारणी केली,त्या धरणाच्या दुरुस्तीसाठी विद्यमान आमदार आबिटकरांनी दोन वर्षांपूर्वी १ कोटी ९२ लाख रुपये खर्च केले,तरीही या धरणाची गळती सुरूच आहे. धरणाच्या व्हॉल्वजवळ पोती लावून गळती रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे चित्र आजही तेथे पाहायला मिळते. या धरणाच्या खालील बाजूस कोल्हापूर पद्धतीचे निकृष्ठ चार बंधारे बांधले असून तेही सतत गळत आहेत. मेघोली धरण फुटून तेथे धोका निर्माण झाला आहे. काळम्मावाडी धरणाच्या गळती आणि कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी टेंडर व निधी मंजूर होवूनही पार्टनरशिपसाठी यांनी कामे थांबविल्याची चर्चा आहे. एकूणच मतदारसंघातील सिंचन प्रकल्पाशी संबंधित अनेक धरणे व बंधाऱ्यांच्या उभारणी व गळतीची कामे निकृष्ट करून विद्यमान आमदारांनी भागीदारीच्या पापातून मोठा सिंचन घोटाळा केला आहे."
शिवसेनेचे उपनेते विजय देवणे म्हणाले,"विकासाचा डोंगर उभा केला म्हणणाऱ्या गद्दार आमदार आबिटकरांनी प्रत्यक्षात पैशांचा सह्याद्री उभा केला आहे. डोंगराची भाषा बोलणाऱ्या या आमदारांनी मतदारसंघातील अनेक डोंगर विकत घेतले असून मातोश्रीशी केलेली गद्दारी आणि जाऊ तेथे खाऊ ही त्यांची वृत्ती या मतदार संघात त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरेल."
संदीप देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी धनाजीराव देसाई, राहुल देसाई ॲड.दयानंद कांबळे,रणजीत बागल आदींची भाषणे झाली.
शामराव देसाई,विश्वजीत जाधव,मधुकर देसाई, के ना पाटील, विलासराव कांबळे, काका देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सुभाष सोनार, बागुल देसाई, शिवाजीराव देसाई, काशिनाथ देसाई, एन के देसाई, बाळासाहेब भालेकर आदी उपस्थित होते. सभेपूर्वी पाटगाव,पाळ्याचा हुडा,म्हासरंग, वेसर्डे,नांदोली,शेळोली, मेघोली,करंबळी आदी ठिकाणी प्रचार दौरा झाला.
*शेतकऱ्यांचे खिशे रिकामे.... मात्र घोटाळ्यातून कोट्यवधी रुपये आबिटकरांच्या खिशात !*
के पी पाटील म्हणाले, " फये धरणाच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी धरणातून पूर्ण पाणी सोडून धरण रिकामे केल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना उसाचे नगदी पीक घेता आले नाही. पाणीच नसल्याने अनेकांची पिके वाळून गेली. एकीकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होवून खिसे रिकामे राहिले असताना आमदार आबिटरांच्या खिशात मात्र सिंचन घोटाळ्यातून कोट्यवधी रुपये येतच राहिले. त्यामुळे त्यांच्या पराभवाचा विडा उचललेले संतप्त शेतकरी आबिटकरांना या निवडणुकीत धडा शिकविणार हे मात्र नक्की आहे."