देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार ? महायुतीत सस्पेन्स कायम

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार ? महायुतीत सस्पेन्स कायम

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. आता राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेची गुऱ्हाळ सुरु आहेत.मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येत आहे. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अजित पवार गट आग्रही असल्याचं बोललं जातंय. परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावं यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीत मुख्यमंत्री पदाबाबत बैठक सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस एका खासगी कामानिमित्त दिल्लीला गेले होते पण त्यांची कोणत्याही वरिष्ठ नेत्यांसोबत भेट झाली नाही. त्यांना रिकाम्या हाती मुंबईत परत यावं लागलं. महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः लक्ष घालणार असल्याची माहितीही समोर येत आहे. 

विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत यासाठी शिंदे गट प्रयत्नशील आहे. परंतु  संख्याबळ पाहता भाजप मुख्यमंत्री पदाची संधी सोडेल असं वाटत नाही. भाजपाही मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत अशी वक्तव्येही भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीत अजूनही सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.