आय.यू.आय. सेंटरचे लोकार्पण शनिवारी सावित्रीबाई फुले रुग्णालयात

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर महानगरपालिका आणि सिद्धगिरी जननी यांच्या संयुक्त उपक्रमातून सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे येत्या शनिवारी (२० जुलै) सकाळी १०:३० वाजता ‘आय.यू.आय. सेंटर’च्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने “निराधारांना आधार” या प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या तत्वाचा आदर्श घेत गेली अनेक वर्षे समाजासाठी आरोग्यसेवा पुरवली आहे. एनएबीएच मानांकन प्राप्त असलेले हे सेवाभावी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर ठरले आहे. त्याच सेवा विस्ताराचा भाग म्हणून 'सिद्धगिरी जननी' हे आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर सुरु करण्यात आले आहे.
आता त्याच पुढाकारातून, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल जोडप्यांसाठी महागडे समजले जाणारे IUI उपचार आता अत्यल्प दरात सावित्रीबाई फुले रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील हे पहिले शासकीय पातळीवरील IUI उपचार व वंध्यत्व सल्ला केंद्र ठरणार आहे.
या कार्यक्रमाला प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी आणि डॉ. वर्षा पाटील उपस्थित राहणार आहेत.
या केंद्रात वंध्यत्वामुळे पालकत्वापासून वंचित असणाऱ्या जोडप्यांसाठी मोफत बाह्यरुग्ण तपासणी, तसेच IUI उपचार पद्धती अल्प दरात दिली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक जोडप्याला उपचाराच्या प्रक्रियेची संपूर्ण व पारदर्शक माहिती दिली जाईल.