कोल्हापूरातील विविध रस्त्यांसाठी अमल महाडिक यांची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे 200 कोटींची मागणी..

कोल्हापूरातील विविध रस्त्यांसाठी अमल महाडिक यांची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे 200 कोटींची मागणी..

              कोल्हापूर जिल्ह्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी 1580 कोटी 87 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून पूर्णत्वाला गेलेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा व विकास कामांच्या भूमिपूजनासाठी मंत्री चव्हाण कोल्हापूरला आले होते.

                लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी अमल महाडिक यांच्या शिरोली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी नामदार रवींद्र चव्हाण यांचा राजर्षी शाहूंची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांचे महाडिक यांनी आभार मानले. 

              त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी आणखी 200 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी त्यांनी केली. यामध्ये हातकणंगले,कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे. विविध राज्यमार्ग,प्रमुख व इतर जिल्हा मार्ग आणि इतर रस्त्यांसाठी निधी देऊन कोल्हापूरच्या विकासाला गती द्यावी अशी मागणी अमल महाडिक यांनी नामदार चव्हाण यांच्याकडे केली.

              महाडिक यांनी मागणी केलेल्या रस्त्यांमध्ये प्रामुख्याने करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागांना राज्यमार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. रस्त्यांची रुंदी वाढवणे, उंची वाढवणे, नवीन पूलांची उभारणी करणे अशा कामांचा समावेश आहे. महापुरामध्ये गावांचा तुटणारा संपर्क पुन्हा जोडला जाईल अशा रस्त्यांची उभारणी करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत नामदार रवींद्र चव्हाण यांनी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले.

             यावेळी मा.आ.महादेवराव महाडिक, शौमिका महाडिक, सत्यजित कदम, राजवर्धन नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते.